उद्धव ठाकरे आज ठाण्यात; हिंदी भाषिक मेळाव्याला करणार मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या शनिवारी ठाण्यात धडाडणार आहे. गडकरी रंगायतन येथे संध्याकाळी 6.30 वाजता होणाऱया हिंदी भाषिकांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार असून राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बऱयाच दिवसांनंतर ठाण्यात येत असून येथील गडकरी रंगायतनमध्ये होणाऱया हिंदी भाषिक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची जय्यत तयारी शिवसैनिकांनी केली आहे. या मेळाव्यास शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते आनंद दुबे, किशन सिंग, हिंदी भाषा विभाग समन्वयक प्रभाकर सिंह आदी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केले आहे.

वाशी येथील भारतीय विद्या भवनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील छायाचित्रांचे प्रदर्शन शनिवारपासून भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संध्याकाळी 5.00 वाजता होणार आहे. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, चित्रपट दिग्दर्शक संदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून प्रदर्शनात विविध विषयांवरील 76 छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. 42 देशांमधील 219 छायाचित्रकारांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील निवडक छायाचित्रे प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन 6 ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहे.

स्थळ – गडकरी रंगायतन
वेळ – संध्याकाळी 6.30