
मुंबईतील छत्रपती शिवाजी मंदीर येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला. उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. आपल्या भाषणात त्यांनी जुलमी पद्धतीने वागणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा व्यवस्थित समाचार घेतला. “फडणवीसांनी आपले घर सांभाळावे. आमच्या घरापर्यंत येऊ नका, परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉटसअप बाहेर येत आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर तुमच्या परिवारावर बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, “मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहे आणि शिवसेना हा माझा परिवार आहे. ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोणी घेत असेल तर ते तुमचे तुम्हाला माहीत. मी माझं कुटुंब जपणार.” कोविड काळात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव होते. या यादीत भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे नाव नसल्याची त्यांना पोटदुखी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ही पोटदुखी त्यांना निवडणुकीत जमालगोटा देऊन साफ करायची आहे असे ते म्हणाले.
मुंबई महापालिकेमध्ये कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशी सुरू करणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी सणकावून काढले. मुंबई महापालिकेची चौकशी करायची असेल तर आम्ही म्हणतो सगळ्या महापालिकांची चौकशी करा, इतकंच काय तर पीएम केअर फंडाचीही चौकशी करा असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. ‘सत्ताधारी म्हणतात पीएम केअर फंड हा चौकशीच्या फेऱ्यात येत नाही, मग पीएम केअर म्हणजे हास्यजत्रेतील प्रभाकर मोरे फंड आहे का ?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारताच सभागृहात एकच हशा उसळला. ते पुढे म्हणाले की, “या केअर फंडातील पैसे गेले कुठे ? आमची चौकशी जरूर करा, मात्र आम्ही तुमची चौकशी का करायची नाही. समान नागरी कायदा म्हणताय तर मग आम्हीही मागणी करतो की ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर करण्याचा अधिकार आम्हालाही द्या. आम्ही सांगतो त्यांच्यावर धाडी टाका. करोडो रुपये कुठून कुठे गेले हा प्रश्न विचारला तर कारवाई होते, मात्र उत्तर मिळत नाही.”
उद्धव ठाकरे यांनी बिहारमधील पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीबाबत बोलताना म्हटले की मी मुद्दा मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो होतो. “तुम्ही मुफ्तींसोबत बसला होता तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटलं होतं का ? तुमचं सुटलं नव्हतं मग आमचं कसं सुटेल. आम्ही हिंदुत्व सोडणार नाही मात्र तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही.” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांवर हल्ला चढवला. ते पुढे म्हणाले की, “370 कलम काढल्यानंतरही कश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाही. मणिपूरमध्ये भयानक परिस्थिती आहे. तिथली परिस्थिती आटोक्यात येत नाहीये. मणिपूरमध्ये जा तिथे हिंदू होरपळत नाहीयेत ? रोज मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येत आहे. ज्या कलमाखाली नवाब मलिक यांना अटक केली, त्याच कायद्याखाली विखे-पाटील यांच्यावर कारवाई होणार की नाही. झाकीर नाईक कडून तुम्ही पैसे घेतले, त्याच्यावर धाडी टाकण्याची हिम्मत आहे? “
“कोविड काळात पीएम केअर फंडाचा घोटाळा बाहेर काढावाच लागेल. उपरे दलाल मुंबईत येऊन मराठी माणसावर दादागिरी करतायत. ज्या यंत्रणांचा तुम्ही वापर करताय, त्यांच्या मायबापांना आम्ही वाचवलं आहे. ईडी, इन्कम टॅक्सी, सीबीआय अधिकाऱ्यांचे जे कुटुंबीय मुंबई-महाराष्ट्रात राहतायत त्या सगळ्यांना आपण वाचवलं आहे. यांचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याशी कसं वागायचं हे शिकून घ्या, मग आम्हाला सोडता येणार नाही.” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आसूड ओढले.



























































