
सामना प्रतिनिधी । मुंबई
गणेशोत्सव जवळ आला असताना महापालिका प्रशासनाकडून गणेश मंडळांना नाहक त्रास दिला जात आहे. न्यायालयाच्या आदेशाचे निमित्त सांगून गणपती मंडप तोडले जात आहेत. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीबरोबरच संभ्रमही आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गणेशोत्सव मंडळांना उद्या मार्गदर्शन करणार आहेत.
गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी देणारी पालिकेची यंत्रणाच योग्यरीतीने काम करत नाही. याशिवाय इतर अनेक यंत्रणांच्याही परवानग्या बंधनकारक असतात. गणेशोत्सव एक महिन्यावर आला असतानाही अनेक मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळालेली नाही. परिणामी वर्षानुवर्षे मंडपातच गणेशमूर्त्या घडवणाऱया मंडळांसमोर समस्या उभी राहिली आहे. पालिका प्रशासनाकडूनही मंडळांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
उद्धव ठाकरे हे गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता न्यू मरीन लाईन्स येथील मुंबई रुग्णालयाच्या शेजारी बिर्ला मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. गणेशभक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






























































