रिलायन्स जिओविरोधात केबलचालकांची बैठक, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav thackeray

सामना ऑनलाईन, मुंबई

वर्षानुवर्षे इमानेइतबारे आपला व्यवसाय करणाऱया राज्यातील हजारो केबलचालकांवर रिलायन्स जिओमुळे बेकारीची  कुऱहाड कोसळणार आहे. फायबर केबलच्या माध्यमातून रिलायन्स थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचणार असल्याने केबलचालक व्यवसायातून बाहेर फेकला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना केबलचालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली असून उद्या शनिवारी दुपारी 1 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात प्रमुख केबलचालकांची बैठक होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केबलचालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यात दहा हजारांहून अधिक मोठे केबलचालक असून विभागनिहाय सेवा देणाऱयांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यांनी स्वतः विभागात केबलचे जाळे उभारले आहे. मात्र रिलायन्स जिओच्या फायबर केबलमुळे वर्षानुवर्षे सेवा देणारे केबलचालक बाजूला फेकले जाणार आहेत तसेच ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी काही दिवस रिलायन्सकडून मोफत सेवा दिली जाणार आहे. याचा केबल व्यावसायिकांना आणि तेथे काम करणाऱयांना मोठा फटका बसणार आहे. याची दखल घेत शिवसेना केबलचालकांच्या पाठीशी उभी राहिली असून कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतची दिशा ठरवण्यासाठी उद्या केबलचालकांची बैठक आयोजित केल्याचे केबल ऑपरेटर डिस्ट्रिब्युशन असोसिएशनचे अध्यक्ष व शिवसेना विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांनी सांगितले.