बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती

]अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या, पॅकेज जाहीर केले, दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा करणार असे सांगितले… पण फडणवीस सरकारने दगाबाजी केली. शेतकर्‍यांना एका पैशाचीही मदत मिळाली नाही. परंतु सरकार मात्र मदत केल्याचा दावा करत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारपासून मराठवाडा दौर्‍यावर येत असून ते अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौर्‍याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेते अंबादास दानवे हे आज लातूर दौर्‍यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची फडणवीस सरकारने पॅकेजच्या नावाखाली कशी फसवणूक केली, ते सांगितले. सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण त्यातील एक रुपयाही शेतकर्‍यांना मिळाला नाही. रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये देणार, असा शब्द सरकारने दिला होता. कापूस, सोयाबीनची अजूनही खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. कर्जमाफीबद्दल सरकार बोलायला तयार नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, त्याला वेळेवर मदत मिळाली नाही तर हे सरकार काय कामाचे, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ५ ते ८ नोव्हेंबर असा चार दिवस मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे मराठवाड्यातील गावागावांत जाऊन चावडी, पारावर बसून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. सरकारने जाहीर केलेले पॅकेज, नुकसानभरपाईची रक्कम मिळाली की नाही याची माहिती ते घेणार आहेत. ‘दगाबाज’ सरकारची पोलखोलच या दौर्‍यात होणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, सुनीता चाळक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

असा असेल दौरा

  • बुधवार, ५ नोव्हेंबर : छत्रपती संभाजीनगरमधील नांदर, बीडमधील पाली, धाराशिवमधील पाथ्रुड, शिरसाव, सोलापूरमधील बार्शीतील शेतकर्‍यांशी संवाद.
  • गुरुवार, ६ नोव्हेंबर : धाराशिवच्या करंजखेडा, लातूरच्या भुसणी, थोरलेवाडी, नांदेडच्या पार्डीतील शेतकर्‍यांशी संवाद.
  • शुक्रवार, ७ नोव्हेंबर : नांदेडच्या अर्धापुरातील पार्डी, हिंगोलीतील वारंगा, जवळाबाजार, परभणीतील पिंगळी स्टेशन येथील शेतकर्‍यांशी संवाद.
  • शनिवार, ८ नोव्हेंबर : परभणीतील ताडबोरगाव, ढेंगळी पिंपळगाव, परभणी, जालन्यातील पाटोदा, लिंबोणी येथील शेतकर्‍यांशी संवाद.