उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले एकवीरा देवीचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पिंपरी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळी सहकुटुंब एकवीरा देवीचे दर्शन घेऊन शिवसेना-भाजप युतीला लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळू दे असे साकडे घातले.

श्रीक्षेत्र कार्ला गडावर सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत होते. हेलीपॅड ते मंदिरदरम्यान त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. कोळीगाण्यांच्या ठेक्यावर बँड पथकाने ताल धरला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकवीरा देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली. सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते एकवीरा आईची खणानारळाने ओटी भरण्यात आली. एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आई एकवीरा देवी आमची कुलदेवता आहे. कोणतेही चांगले कार्य करताना परंपरेनुसार प्रत्येक वेळी आईचे आशीर्वाद घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक कार्यात यश नक्की मिळते हा अनुभक आहे. शिवसेनेची पुढील वाटचाल चांगली राहावी आणि भरघोस यश मिळावे यासाठी आशीर्वाद मागायला आलो आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीला भरघोस यश मिळू दे, असे साकडे एकवीरेला घातले.

शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, ऍड. आमदार गौतम चाबूकस्वार, माजी आमदार अनंत तरे, विश्वस्त मदन भोईर, नागनाथ देशमुख, विकास कुटे, रायगडचे शिवसेना सल्लागार बबन पाटील, पुणे जिल्हा सल्लागार मच्छिंद्र खराडे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते.