तामिळनाडूवर हिंदी लादण्याची परवानगी मिळणार नाही – उदयनिधी स्टॅलिन

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर हिंदी लादल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत म्हटले आहे की, त्रिभाषा धोरणाच्याआडून राज्यावर हिंदी लादण्याची परवानगी कधीच दिली जाणार नाही. नागोर येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्रावर आरोप केला की, “तामिळनाडूमध्ये त्रिभाषा धोरण लागू न झाल्यामुळे २००० कोटी रुपयांचा शिक्षण निधी रोखला जात आहे. तुम्ही १०,००० कोटी रुपये मोफत देऊ शकता, पण तुम्हाला तामिळनाडूवर हिंदी लादण्याची परवानगी दिली जाणार नाही.”

दरम्यान, केंद्राच्या त्रिभाषा धोरणावर उदयनिधी स्टॅलिन सातत्याने टीका करत आहेत, याआधी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले होते की, “हिंदी थोपण्यामुळे गेल्या १०० वर्षांत उत्तर भारतातील २५ भाषा नामशेष झाल्या आहेत. एकसंध हिंदी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात प्राचीन भाषांचा नाश होत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार हे कधीच हिंदी भाषिक प्रदेश नव्हते. आता त्यांची मूळ भाषा इतिहासात जमा झाली आहे.”