
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत पक्षातून बाहेर पडलेले उदयनराजे भोसले यांनी शनिवारी सकाळी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेले साताऱयाचे खासदार उदयनराजे यांनी शनिवारी पहाटे दीड वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर सकाळी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, रिपाइं नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढे चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करताहेत. त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊनच आपण भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत भाजप प्रवेशामागची भूमिका स्पष्ट केली. तर लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही युतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
पोटनिवडणुकीत पृथ्वीराज उतरणार?
उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानसभेसोबतच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांना तोडीस तोड देणारा उमेदवार नसल्याने ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार असल्याची चर्चा आहे; मात्र चव्हाण यांनी तूर्तास तरी नकार दिला आहे.























































