
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
मुलांना शाळेत प्रवेश घेताना कुठल्याही शैक्षणिक संस्थेने त्यांच्या पालकांकडे आधार कार्ड मागू नये. कारण शाळेच्या ऍडमिशनसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलेले नाही. जर कुणी आधार कार्ड मागत असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल आणि संबंधित शैक्षणिक संस्थांवर कारवाई होईल, असा इशाराच ‘यूआयडीएआय’ अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिला आहे.
नवी दिल्लीत सध्या खासगी शाळांमध्ये नर्सरीसाठी दीड हजार मुलांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा वेळी यूआयडीएआयने हा इशारा दिला आहे. अनेक शाळा मुलांना प्रवेश देताना आधार कार्ड सादर करण्याची सक्ती करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यूआयडीएआयने हे स्पष्टीकरण दिले आहे. आधार कार्ड बँक खाते, मोबाईल सेवा किंवा शाळा प्रवेशासाठी सक्तीचे करता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्येच दिले होते.
आधार कार्डची कायद्यात तरतूद नाही
शाळांमध्ये मुलांना पुरवण्यात येणाऱया सोयीसुविधांसाठीही आधार कार्डची सक्ती करता येणार नाही. तशी कायद्यात तरतूदच नसल्याचे यूआयडीएआयने म्हटले आहे, अशी माहिती यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी दिली. शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाने कुणीही मूल शाळा प्रवेशाशिवाय राहू नये याची खबरदारी घ्यायला हवी तसेच शाळांनीच विशेष शिबिरे भरवून या मुलांची आधार कार्ड तयार करून घ्यावीत, असेही पांडे यांनी सांगितले.
































































