
उजनी धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. परिणामी उजनी धरण 102 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून गुरुवारी रात्री 2 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता. यामध्ये वाढ करत आज सकाळी 16 दरवाजांमधून 40 हजारांचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर वीर धरणातूनही 24 हजार 184 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
उजनी धरण 102 टक्के भरले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुणे जिह्यातील वादळी वाऱयासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, धरण प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तातडीच्या उपाययोजना म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, पुणे जिह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरलेली आहेत. पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथून येणाऱया विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे उजनी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
उजनी धरणातील पाणीपातळी
(सायंकाळी 7 वाजता)
एकूण पाणीपातळी – 496.969 मीटर
एकूण साठा – 3363.92 दलघमी (118.78 टीएमसी)
उपयुक्त साठा – 1561.18 दलघमी (55 टीएमसी)
टक्केवारी – 102.89 टक्के
आवक
दौंड विसर्ग – 55 हजार 224 क्युसेक
बंडगार्डन – 26 हजार 21 क्युसेक
विसर्ग
भीमा नदीत – 40 हजार क्युसेक
कालवा – 2000 क्युसेक
वीज निर्मिती – 1600 क्युसेक
बोगदा – 800 क्युसेक
सीना-माढा उपसा सिंचन – 259 क्युसेक
दहीगाव उपसा सिंचन – 43 क्युसेक


























































