वरुणराजाची कृपा; ‘उजनी’ पन्नाशीकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या सोलापूर जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा होत आहे. जिल्हात होणारा आणि पुण्याकडील पावसामुळे जिल्हाची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची वाटचाल ‘पन्नाशी’कडे सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाळ्यातील अनेक नक्षत्रे कोरडी गेल्याने चिंता वाढली होती. पावसाअभावी रब्बी पिकांची पेरणी खोळंबली होती. इतकेच नव्हे, तर प्रशासनाने सलग 21 दिवस पाऊस न पडल्यामुळे जिल्हात दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी अहवाल सादर केला आहे. दरम्यान, उजनी धरणाच्या वरील भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरण वेगाने भरत आहे. उजनीतील वाढत्या पाणीपातळीमुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

सोलापूरसह तीन जिल्ह्यांची वरदायिनी असलेले उजनी धरण पावसाने ओढ दिल्यामुळे जूनमध्येच मायनसमध्ये गेले होते. सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून, पावसाअभावी उजनीच्या पाणीपातळीत झालेली घट याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पुणे जिल्हातील घाटमाथ्यावर विशेषकरून उजनीच्या वरील धरणक्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने उजनीची पाणीपातळी वाढत आहे. गेल्या चार दिवसांत 5 टीएमसी पाणी जमा झाले आहे. उजनीवरील बहुतेक सर्व धरणे क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने गेल्या आठ दिवसांपासून उजनीत येणाऱया विसर्गामध्ये वाढ झाली आहे. विशेषकरून बंडगार्डन येथून 17 हजार, तर दौंड येथून 40 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक विसर्ग आहे. उजनीवरील पानशेत, वरसगाव व खडकवासला ही धरणे भरली असून, मुळा नदीत पाणी सोडले जात आहे. याचा मोठा लाभ उजनी धरणाला होत आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून सीना, माढा आणि दहीगाव सिंचन योजनांचे आवर्तन आजपासून सुरू होणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी 3 ऑक्टोबरपासून उजनीच्या कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली. सीना, माढा सिंचन योजना व करमाळा तालुक्यातील दहीगाव सिंचन योजना यामधून अनुक्रमे 159 क्युसेक व 85 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी 3 ऑक्टोबरपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी उजनीच्या मुख्य कालव्यातून दोन हजार 500 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे.

– एकूण पाणीपातळी : 494.045 मीटर

– एकूण पाणीसाठा : 2489.55 द.ल.घ.मी., 88 टीएमसी

– उपयुक्त पाणीसाठा : 686.74 द.ल.घ.मी., 24.25 टीएमसी

– टक्केवारी : 45.26 टक्के

विसर्ग : दौंड 29850 व बंडगार्डन 13830 क्युसेक. या दोन धरणांसह अन्य धरणांतूनही विसर्ग सुरू असल्याने मंगळवारी उजनी धरण 50 टक्के भरण्याची आशा निर्माण झाली आहे.

आणखी 40 टीएमसीची गरज

उजनी धरणाची क्षमता 123 टीएमसी असून, धरण भरण्यासाठी आणखीन 40 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग असाच राहिला, तर धरण 100 टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उजनीवरील 19पैकी 16 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने सरासरी 95 ते 100 टक्के भरलेल्या या धरणातून विसर्ग वाढविण्यात येत आहे. सोलापुरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत 49 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला आहे.

अर्थकारणाला दिलासा

उजनी धरणातील पाणीपातळीत सातत्याने होणारी वाढ ही सोलापूरसह नगर, पुणे जिह्यांतील अर्थकारणाला दिलासा देणारी आहे. सोलापूर जिह्यात उजनीमुळे बागायतक्षेत्र वाढले आहे. दोन लाख 40 हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र असून, राज्यातील सर्वाधिक सहकारी व खासगी तत्त्वावरील साखर कारखाने सोलापूर जिह्यात आहेत. त्याचप्रमाणे द्राक्ष, डाळिंब, केळी, चिकू, आंबा यांसह फळबागांची मोठय़ा प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सध्या रब्बी पिके ज्वारी, मका, भुईमूग, हरभरा यांचीही लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली असून, सध्याच्या पावसामुळे या पिकांना मदत मिळणार आहे. त्यामुळे उजनी धरणातील वाढणारी पाण्याची पातळी व सध्याची पावसाची स्थिती शेती, उद्योग व व्यापाराला दिलासा देणारी ठरणार आहे.