अमेरिकेनंतर यूकेचा दणका; हिंदुस्थानचा दडपशाही प्रवृत्तीच्या देशांच्या यादीत समावेश

हिंदुस्थान सरकारने फेटाळला अहवाल आर्थिक पातळीवर अमेरिकेच्या दबावाचा सामना करणाऱया हिंदुस्थानला आता यूकेने दणका दिला आहे. यूकेच्या संसदीय समितीने हिंदुस्थानला दडपशाही प्रवृत्तीच्या देशांच्या यादीत टाकले आहे.

‘यूकेतील आंतरराष्ट्रीय दडपशाही’ हा अहवाल नुकताच तेथील संसदीय समितीने सादर केला. ब्रिटनमध्ये राहणाऱया सामाजिक कार्यकर्त्यांचा व संघटनांचा विरोधी आवाज दाबण्याचा, त्यांना धमकावण्याचा प्रयत्न जगातील काही देशांकडून होत आहे. अशी दडपशाही करणाऱया 12 देशांची यादीच ब्रिटनने प्रसिद्ध केली आहे. त्यात हिंदुस्थानचा समावेश आहे. हिंदुस्थानसह यात रशिया, चीन, इजिप्त, बहरीन, इराण, पाकिस्तान, रवांडा, सौदी अरेबिया, तुकाa, यूएई, इरिट्रिया या देशांचा समावेश आहे. हिंदुस्थानच्या दडपशाहीचा दाखला देताना समितीने खालिस्तानवादी सिख्स फॉर जस्टीसचा उल्लेख केला आहे. या संघटनेला हिंदुस्थानकडून टार्गेट केले जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल फेटाळून लावला आहे. ’ब्रिटनच्या समितीच्या अहवालातील संदर्भ आम्ही तपासले आहेत. हे आरोप निराधार आहेत. हिंदुस्थान द्वेषाचा इतिहास असलेल्या संघटनांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बनलेला हा अहवालच विश्वासार्ह नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले.