युक्रेनचे विमान चुकून पाडले, इराण सरकारची धक्कादायक कबुली

432

युक्रेनचे प्रवासी विमान क्षेपणास्त्र्ा हल्ल्यात पाडल्याची धक्कादायक कबुली इराण सरकारने दिली आहे. ही मानवी चूक असल्याचेही इराणने स्पष्ट केले आहे. या हल्ल्यात विमानातील 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. युक्रेन एयरलाइन्सचे हे प्रवासी विमान इराणच्या लष्करी तळाच्या दिशेकडे येत होते. त्यामुळे आपल्याकडून ही चूक घडल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र इराण सरकार काहीतरी लपवत असल्याचा संशय युक्रेन सरकारकडून व्यक्त होत आहे. आता सत्य बाहेर आले असून इराण सरकार दोषींवर कडक कारवाई करील, तसेच प्रवाशांचे मृतदेह युक्रेन सरकारकडे सोपवेल अशी आशा असल्याचे युक्रेनचे पंतप्रधान वोलोडाइमिर जेलेन्स्की यांनी आपल्या फेसबुक पेजवर म्हटले आहे.

विमान दुर्घटनेप्रकरणी चौकशीसाठी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांकडे मदत मागितली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटन आणि कॅनडाने इराणने विमान पाडल्याचा दावा केला होता, तर इराणने मात्र त्यांचा हा दावा फेटाळून लावत तो अपघातच होता असे म्हटले होते. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या अल कद्स फोर्सचे जनरल टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर 22 क्षेपणास्त्र डागली होती. इराणच्या हल्ल्यानंतर काही वेळातच ही विमान दुर्घटना घडली.

आपली प्रतिक्रिया द्या