जुहूच्या युनियन बँकेतील 70 खातेदारांना लुटले

1180
प्रातिनिधिक फोटो

युनियन बँकेच्या जवळपास 70 खातेधारकांना सायबर भामटय़ाने मोठा धक्का दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपीने या खातेधारकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्याआधारे प्रत्येकाच्या बँक खात्यातून 15 ते 20 लाख रुपये काढले आहे. या घटनेमुळे खातेधारकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून सांताक्रुझ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सांताक्रूझच्या जुहू तारा रोडवर युनियन बँक आहे. 8 ते 9 डिसेंबर या काळात सायबर भामटय़ाने कार्ड क्लोनिंग करून खातेधारकाच्या खात्यातून 3 ते 15 हजार अशी रक्कम काढली. पैसे गेल्याचे समजताच खातेधारकांनी बँकेशी संपर्क साधला तेव्हा हा प्रकार समोर आला. बँकेने सर्व्हरद्वारे माहिती काढण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 70 खात्यांतून पैसे काढल्याची माहितीसमोर आली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

भामटय़ाने विविध एटीएममधून हे पैसे काढल्याचे समजते. पोलीस काही एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत. तपासाकरिता एक पथक तयार करण्यात आले आहे. ज्याच्या खात्यातून पैसे गेले अशा ग्राहकांना बँकेने डिस्प्युट फॉर्म दिले आहेत. खात्यातून पैसे गेल्याच्या घटनेमुळे खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या खातेधारकांच्या खात्यातून पैसे गेले अशांची पोलिसांनी माहिती बँकेकडून मागवली आहे. त्यावरून कोणत्या खात्यातून किती पैसे गेले आणि ते कुठल्या एटीएममधून काढले गेले हे स्पष्ट होणार आहे.

कार्ड क्लोनिंग करून फसवणूक करणाऱया दोघांना जून महिन्यात गुन्हे युनिट-10 ने अटक केली होती.

गेल्या वर्षी एका खासगी बँकेच्या एटीएममध्ये कार्ड क्लोन करून 50 जणांच्या खात्यातून पैसे काढले गेले होते

फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईच्या एका बँकेत कार्ड क्लोन करून

1 लाख 8 हजार रुपये काढले गेले

 गेल्या वर्षी कार्ड क्लोन करून पैसे काढणाऱया तरुणाला विक्रोळी पोलिसांनी अटक केली होती.

 2017 साली मुलुंड येथील एका बँकेच्या एटीएममध्ये कार्ड क्लोनिंग करून 35 ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले होते.

आपली प्रतिक्रिया द्या