
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जनतेची आशा, विश्वास मिळवून दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार- 2 चा पहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याच्याआकांक्षेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘मजबूत देश के लिए मजबूत नागरिक’ अशी घोषणा देतानाच अर्थमंत्र्यांनी गुंतवणूक आणि उत्पन्नवाढीवर विशेष भर दिला आहे. विमा क्षेत्रात 100 टक्के एफडीआय देतानाच रेल्वेत ‘पीपीपी’ मॉडेल राबविले जाणार आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी पॅनकार्ड नसले तर ‘आधार’ चालणार आहे. कोटय़धीशांकडून जादा कर घेतला जाणार असून यातून सरकारी तिजोरीत पैसा येणार आहे. प्राप्तीकर रचना जैसे थे, 45 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजात 3.50 लाखांपर्यंतची सूट दिली आहे, मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
यकीन हो तो कोई रास्ता निकलता हैं, हवा की ओट भी लेकर चिराग जलता हैं!
तुमच्या खिसा–पाकिटावर असा होईल परिणाम
- 45 लाखांच्या घरखरेदीवर आता दोन लाखांपर्यंतचे व्याज करमुक्त आहे. त्यात आणखी दीड लाखाची भर घालण्यात आली आहे. मात्र 31 मार्च 2020 पर्यंत घरखरेदी केली, त्यासाठी गृहकर्ज घेतले तरच ही सूट मिळणार आहे.
- 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, कररचनेत कुठलाही बदल नाही
- इलेक्ट्रिक वाहनखरेदीवर दीड लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याज करमुक्त
- पेट्रोल-डिझेलवर 1 रुपया सेस किंवा विशेष अतिरिक्त शुल्क आकारणार
- सोने-चांदीवरील सीमाशुल्कात 10 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढ
- पॅनकार्ड नसल्यास आधारकार्डाच्या मदतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार
- बँकेतून एका वर्षात 1 कोटींहून अधिक रोख रक्कम काढल्यास 2 टक्के कर
- राष्ट्रीय विमा योजनेतून मॅच्युरिटीच्यावेळी काढण्यात येणारी 60 टक्के रक्कम करमुक्त
- 2 ते 5 कोटींपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के अधिभार तर 5 कोटींपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना 7 टक्के अधिभार लावण्याचा प्रस्ताव
ब्रीफकेस बासनात; ‘वही-खाते’ आणले!
बजेट शब्दाची व्युत्पत्ती ‘बुगेट’ या फ्रेंच शब्दावरून झाली आहे. बुगेट म्हणजे चामडय़ाची थैली. म्हणूनच या परंपरेला बजेट असे म्हटले जाऊ लागले. 159 वर्षांपूर्वीपासून इंग्रजांनी ब्रीफकेसमधून बजेटचे भाषण आणण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानच्या अर्थसंकल्पाची काळय़ा चॉकलेटी आणि लाल रंगाच्या ब्रीफकेसची परंपरा होती. निर्मला सीतारामन यांनी ‘वही-खाते’ आणून ती परंपरा तोडली.
निर्मला सीतारामन
हिंदुस्थानच्या पहिल्या महिला अर्थमंत्री. शुक्रवारी त्यांनी लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना पाण्याच्या एका घोटासाठीही न थांबता सलग दोन तास 17 मिनिटे भाषण केले. अर्थसंकल्पीय भाषणांच्या इतिहासातील हा एक विक्रमच!
शेअर बाजारात नापसंती
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्सने 40 हजारांचा आकडा पार केला होता. पण अर्थमंत्र्यांचे भाषण संपताच सेन्सेक्स 546, तर निफ्टी 161 अंकांनी कोसळला.
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी विशेष काहीच नाही
महाराष्ट्रात तीन-चार महिन्यांनंतर होणाऱया विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा किंवा तरतूद केली जाण्याची शक्यता होती. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रासाठी विशेष अशी काही तरतूद किंवा घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली नाही. मेट्रो-रेल्वे प्रकल्पांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे विकास करण्यात येईल. उपनगरीय रेल्वे विकासासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात येतील. भारतीय रेल्वेच्या उपनगरीय सेवा आणि दीर्घ पल्ल्याच्या सेवा या मुंबई आणि इतर शहरांमध्ये उत्कृष्ट काम करत असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
पेट्रोल 2.50 रुपयांनी, डिझेल 2.30रुपयांनी महागले
अर्थसंकल्पातील घोषणेनंतर लगेचच शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेल महागले आहे. पेट्रोलच्या दरात 2 रुपये 50 पैसे तर डिझेलचा दर 2 रुपये 30 पैशांनी वाढला आहे. मुंबईत पेट्रोल 78.57 पैसे, तर डिझेल 69.90 पैसे झाले आहे. आतापर्यंत पेट्रोलवर 17 रुपये 98 पैसे आणि डिझेलवर 13 रुपये 83 पैसे प्रति लिटर एक्साईज डय़ुटी होती. त्यात 1 रुपयाची वाढ झाली आहे. तसेच रस्ते आणि बांधकाम सेससुद्धा प्रति लिटर 1 रुपयाने वाढवला आहे. त्याशिवाय स्थानिक विक्री कर वाढला तो वेगळाच. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे.
स्वस्त
- गृहकर्ज
- इलेक्ट्रिक कार
- साबण
- सॅनिटरी नॅपकीन
- शाम्पू
- हेअर ऑइल
- टूथपेस्ट
- कपडे धुण्याची पावडर
- पंख्याचे सामान
- ट्रव्हल्स बॅग
- कंटेनर
- स्वयंपाकघरातील भांडी
- चादर
- चष्म्याची फ्रेम
- सुके खोबरे
- पास्ता
- मोबाईल चार्जर
महाग
- सिगारेट, तंबाखू, गुटखा
- पेट्रोल, डिझेल
- सोने, चांदी
- डिजिटल कॅमेरे
- सीसीटीव्ही कॅमेरा
- लाऊडस्पीकर
- एसी
- काजू
- आयात प्लॅस्टिक
- पुस्तके
- वाहनांचे सुटे भाग
- आयात वाहने
- ऑप्टिकल फायबर
- घरासाठी लागणाऱया टाइल्स , संगमरवर
- वर्तमानपत्रांचे कागद
- सेट टॉप बॉक्स
रुपया असा येणार
- जीएसटी – 19 पैसे
- कॉर्पोरेशन टॅक्स – 21 पैसे
- आयकर – 16 पैसे
- करमुक्त महसूल – 9 पैसे
- केंद्रीय अबकारी कर – 8 पैसे
- सीमा शुल्क – 4 पैसे
- नॉन डेबिट कॅपिटल – 3 पैसे
- उधारी आणि इतर – 20 पैसे
रुपया असा जाणार
- राज्यांना जाणार – 23 पैसे
- राज्यांना जाणारे व्याज – 18 पैसे
- संरक्षणावर खर्च – 9 पैसे
- केंद्रीय योजना – 13 पैसे
- केंद्र पुरस्कृत योजना – 9 पैसै
- फायनान्स कमिशन खर्च – 7 पैसे
- सबसिडी – 8 पैसे
- पेन्शन – 5 पैसे
- इतर – 8 पैसे
अहो, ऐकलंत का ?
अर्थसंकल्प हिंदुस्थानला अधिक शक्तिशाली बनवणारा आणि 21 व्या शतकातील स्वप्ने आणि प्रगतीचे संकल्प पूर्ण करणारा आहे. – नरेंद्र मोदी
पॅनकार्ड नसले तरीही आधार कार्डच्या मदतीने इन्कम टॅक्स भरता येणार. ही काय कॉमेडी सुरू आहे काय ? भाषणातील मुद्देही अस्पष्ट आहेत. – पी. चिदंबरम
शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणारा, गरीबांना सन्मानाचे जीणं बहाल करणारा, मध्यमवर्गीयांना खूश करणारा अर्थसंकल्प.- अमित शहा
काँग्रेसचा अर्थसंकल्प शेखचिल्लीच्या गोष्टीसारखा असायचा. आम्ही आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. – पीयूष गोयल
लघु आणि मध्यम श्रेणींच्या उद्योगांना दिलेले उत्तेजन हे बजेटचे खास वैशिष्टय़ आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि तत्सम पायाभूत सुविधा यांच्यामुळे अर्थव्यवस्थेत मोठा सुधार होईल. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. – नितीन गडकरी
अर्थसंकल्प देशाचे आणि देशवासीयांचे भविष्य उज्ज्वल करणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अर्थसंकल्प यशस्वी होईल. समाजातील सर्व स्तरांचे हित जपणारा अर्थसंकल्प आहे.- राजनाथ सिंह
पाच ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीचे उद्दिष्ट गाठणे कठीण आहे, पण अशक्य नाही. त्यासाठी विकासाचा वेग वाढवावा लागेल. – डॉ. नरेंद्र जाधव
अर्थसंकल्पात नवे काहीच नाही. जुन्याच घोषणा पुन्हा केल्या आहेत. नव्या बाटलीत जुनी दारू ओतल्याचा हा प्रकार आहे.- अधीर रंजन चौधरी

























































