
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारागृहात असलेला त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासंदर्भात पत्रकारांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते खवळले. मंत्र्यांनी उपस्थित पत्रकाराचा माईक हिसकावून घेत त्याला चोर म्हणत शिवीगाळ केली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
मंत्री उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करत होते. त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर झालेल्या नव्या आरोपांबाबत एका पत्रकाराने विचारले असता मंत्री ओरडले, “असले मूर्खासारखे प्रश्न विचारू नका. तुमचं डोकं खराब आहे का?” केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा दुसऱ्या एका पत्रकाराचा माईक हिसकावताना दिसत आहेत.
3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरच्या टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याने शेतकऱ्यांवर जीप चढवल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली. या प्रकरणात 14 जणांना आरोपी करण्यात आले आहे. दुसरीकडे, अजय मिश्रा भाजपच्या तिकिटावर 2012 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत निघासन मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, त्यानंतर सपाचे सरकार स्थापन झाले.
























































