संयुक्त राष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट

सदस्य राष्ट्रांनी शुल्क थकवल्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. अगोदर एसी, लिफ्ट तसेच एस्केलेटर बंद केल्यानंतर आता मुख्यालयात शनिवार, रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जगभरातील 165 देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्राची स्थापना केली. संयुक्त राष्ट्राचा कारभार चालवण्यासाठी प्रत्येक देशाला ठरावीक शुल्क ठरवून देण्यात आले आहे. या पैशांवरच संयुक्त राष्ट्राचा कारभार चालतो. यंदा 165 पैकी 100 देशांनीच त्यांचे शुल्क दिले आहे. 65 देशांकडे जवळपास 9800 कोटी रुपये थकले आहेत. यापैकी एकटय़ा अमेरिकेकडेच 1 कोटी डॉलर्स थकले आहेत.

गेल्या आठवडय़ात संयुक्त राष्ट्राचे महासचिव ऍण्टोनियो गुट्रेस यांनी ज्यांच्याकडे पैसे थकले आहेत त्या राष्ट्रांनी लवकर भरणा करावा असे आवाहन केले होते, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली आणि संयुक्त राष्ट्राला आपल्या कार्यालयातील एसी, लिफ्ट, एस्केलेटर बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कर्मचाऱयांचे मागच्या महिन्याचे पगार कसेबसे झाले पण आता 37 हजार कर्मचाऱयांच्या चालू महिन्याच्या पगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिजोरीत पैसेच नसल्यामुळे गुट्रेस यांनी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय शनिवार, रविवार असे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदुस्थानने 165 कोटी रुपये भरले

संयुक्त राष्ट्राचे शुल्क नियमित भरणाऱया देशांमध्ये हिंदुस्थान अग्रक्रमावर आहे. या वर्षीच्या 31 जानेवारीपर्यंत हिंदुस्थानने 165 कोटी रुपयांचा भरणा संयुक्त राष्ट्रात केला आहे. याशिवाय 33 देशांनी त्यांचे शुल्क तातडीने भरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या