शिरूरच्या रांजण खळग्यातील कुंडात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

538
प्रातिनिधिक

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी व पारनेर येथील निघोज परिसरातल्या जगप्रसिद्ध रांजणखळगे येथील कुंडात एका अनोळखी महिलेचा मृतदेह दुपारी आढळून आला आहे.

साधारण 35 ते 36 दरम्यान वय असलेल्या या महिलेच्या अंगावर लाल काळा रंगाचा सलवार व कुर्ता होता. त्यावर पांढऱ्या रंगावर काळे ठिपके असे कपडे होते. साधारण तीन महिन्यांपूर्वी हा मृतदेह पाण्यातच असण्याची शक्यता निघोज पोलीस दूरक्षेत्रचे हेड कॉन्स्टेबल अशोक निकम यांनी माहिती देताना सांगितले. हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. तसेच शरीराचा बराचसा भाग नाहीसा झाला होता. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी काही लोकांनी कुंडात हा मृतदेहाचा काही भाग तरंगताना दिसल्याने त्यांनी याबाबत निघोज पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली.

मृतदेह अत्यंत वाईट परिस्थितीत असल्याने तिथेच शवविच्छेदन करण्यात आले. तसेच सायंकाळी साडेसहा वाजता कुंड परिसरात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कामगार तलाठी विनायक निंबाळकर व हेड कॉन्स्टेबल अशोक निकम यांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. अधिक माहितीसाठी निघोज येथील हेडकाँस्टेंबल अशोक निकम मोबाईल नंबर 888 883 0908 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पारनेर पोलीसांनी केले आहे. पारनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजयकुमार बोत्रे तसेच निघोज पोलीस या दुर्घटनेचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या