पाचेगाव येथे अज्ञात व्यक्तीची हत्या, आरोपींना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करुन या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पुनतगावचे पोलीस पाटील संजय वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कचरू पडोळ हा शेतकरी शुक्रवारी सकाळी शेतात गिन्नी गवत कापण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला रक्ताच्या धारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्याने तात्काळ ही माहिती पोलीस पाटलांना दिली. माहिती मिळताच नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक विजय भोम्बे, मनोज आहेर, विकास पाटील आणि पोलीस नाईक ढमाळे हे घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. हत्या झालेल्या व्यक्तीचे अंदाजे 35 वर्ष असून अंगावर टी शर्ट, जीन्स पॅन्ट घातले आहे. उजव्या हातावर महाकाल देवाचा फोटो गोंदलेला असून काळभैरव असे लिहलेले आहे.

अज्ञात व्यक्तीची ओळख पटवणे आणि आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी देखील भेट दिली आहे. सदर हत्येबाबत पोलिसांना धागेदोरे मिळाले असून लवकरच आरोपीपर्यंत पोहचू, असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला.