इथे ओशाळली माणुसकी! 90 टक्के भाजलेल्या अवस्थेत पीडितेचा मदतीसाठी टाहो, पण…

1472

हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार व हत्या प्रकरण ताजे असताना उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथे एका तरुणीला पाच आरोपींनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी एअर लिफ्टद्वारे दिल्लीला हलवण्यात येणार आहे. या घटनेनंतर उन्नावमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यातील तीन आरोपींनी अटक करण्यात आली असून दोघे अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

उन्नाव येथील घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच ओशाळलेली माणुसकीही दिसून आली. या प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी रविंद्र प्रकाश यांनी धक्कादायक माहिती दिली. आरोपींनी पीडितेला जाळल्यानंतर ती मदतीसाठी टाहो फोडत होती. 90 टक्के भाजल्यानंतरही जवळपास एक किलोमीटर अंतर ती चालत होती आणि लोकांकडे मदत मागत होती. मात्र दगडाच्या काळजाच्या लोकांनी मात्र तिला मदत केली नाही. अखेर पीडितेने जळालेल्या अवस्थेमध्ये घराबाहेर काम करणाऱ्या रविंद्रची मदत मागितली. यानंतर 112 नंबरवर फोन करून तक्रार दाखल केली.

unnao-pti

पीडितेच्या तक्रारीनंतर पीआरव्ही आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर लखनौ येथील सिव्हील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. येथून एअर लिफ्टद्वारे तिला दिल्लीला नेण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे नक्की प्रकरण?
हिंदुनगर गावात राहणाऱ्या या पीडितेवर मार्च महिन्यात 5 जणांच्या एका टोळक्याने सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पीडितेने याबद्दल पोलिसात तक्रार केली. यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यातील एकाला पकडण्यात आले. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच जामिनावर तो सुटला होता. पीडितेने तक्रार केल्याने टोळके चवताळले होते. तिला कायमची अद्दल घडवण्याचा त्यांनी कट रचला होता. पण बलात्काराच्या घटनेमुळे हादरलेल्या पीडितेने घराबाहेर निघणेच बंद केले. यामुळे आऱोपी योग्य संधीच्या शोधात होते. मंगळवारी ही संधी त्यांना मिळाली. पीडिता भाटन खेडा येथून पायी रेल्वे स्टेशनकडे निघाली होती. त्याचवेळी टोळक्याने तिची वाट अडवली. आरोपींना बघताच पीडीतेने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचवेळी त्यातील एकाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतले व दुसऱ्याने तिला पेटवले. त्यानंतर तिथून ते पसार झाले.

आपली प्रतिक्रिया द्या