दुसर्‍यांदा पेटताना पाहण्याची हिंमत नाही, म्हणून केले दफन

4853

माझ्या बहिणीला त्या नराधमांनी आधीच जिवंत जाळले. तिने प्रचंड वेदना सहन केल्या. वेदनेने तडफडून तिने प्राण सोडला.  आता  पुन्हा तिला पेटताना पाहण्याची आमची हिंमतच होत नव्हती. त्यामुळे आम्ही तिचा दफनविधी केला. हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आहे उन्नावच्या बलात्कार पीडितेच्या मोठ्या बहिणीचा. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाच नराधमांनी मिळून तिला जिवंत जाळले होते.  तब्बल 90 टक्के भाजलेल्या या निर्भयाची  झुंज अपयशी ठरली आणि शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिने प्राण सोडला.

या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे कुटुंबातील एका मुलीला नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकदा आपल्या गावाला भेट द्यावी अशी मागणीही बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. अखेर पोलीस आयुक्तांनी सरकारच्या वतीने नोकरी आणि शस्त्र परवाना देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.

15 तासांनंतर  निघाली अंत्ययात्रा

90 टक्के भाजलेल्या या बलात्कार पीडितेला लखनौ ते दिल्ली असे एअरलिफ्ट करून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  अंगाचा प्रचंड दाह होत असतानाही तिला जगण्याची आशा होती. मला जगायचेय, मरायचे नाही असे ती वारंवार बहिणीला सांगत होती. अखेरच्या श्वासापर्यंत तिने जगण्यासाठी संघर्ष केला, परंतु तिची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी रात्री 9 वाजता तिचा मृतदेह गावी आणण्यात आला. तब्बल 15 तास मृतदेह घरात ठेवण्यात आला होता. त्यानंतर तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. कुटुंबीयांनी शेतातच तिचा मृतदेह दफन केला.

देशभरातील वाढत्या सामूहिक बलात्कार आणि हत्यांविरोधात मुंबईत रविवारी मरीन ड्राइव्ह येथे विविध सामाजिक संघटनांतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातही संताप व्यक्त करत निदर्शकांनी घोषणाबाजी केली. शहा आणि आदित्यनाथ यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, केंद्राने कठोर कायदा करावा अशी आग्रही मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या