उन्नावमध्ये पेटवून घेतलेल्या बलात्कारपीडितेची झुंज अखेर संपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
death

उन्नावच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर पेटवून घेणाऱया बलात्कारपीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अखेर अपयशी ठरली. ही तरुणी 80 टक्के भाजली होती. तिची प्रकृती चिंताजनक होती. 16 डिसेंबर रोजी तिला कानपूरच्या लाला लजपत राय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

नराधम बलात्काऱयाने पीडितेला लग्नाचे आमिष देऊन बलात्कार केला होता, परंतु त्यानंतर त्याने तिच्याशी लग्नाला नकार दिला. अवधेश सिंह असे या नराधमाचे नाव असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. असे असताना न्याय मिळत नसल्याने हताश होऊन बलात्कारपीडितेने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच पेटवून घेतले होते. शनिवारी सकाळपासून ती व्हेंटिलेटरवर होती. दरम्यान, पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितल्यानुसार पीडितेचे अवधेशसोबत अनेक वर्षे प्रेमसंबंध होते. 2 ऑक्टोबर रोजी पीडितेने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता.