
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बलात्कार पीडितेने बुधवारी संध्याकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उन्नाव पीडितेने तिची आपबिती सांगितल्यानंतर राहुल गांधी व सोनिया गांधी हे भावूक झाले होते.
या भेटीत पीडितेने राहुल गांधी यांच्याकडे तीन मागण्या केल्या आहेत. ”मला सर्वोच्च न्यायालयात माझी केस लढायला एक चांगला वकील द्या. माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सध्या मला सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे मला जिथे काँग्रेसचे राज्य आहे तिथे पाठवा जेणेकरून मला सुरक्षा पुरवली जाईल. तसंच मला रोजगाराची गरज आहे. त्यामुळे मला नोकरी द्या”, अशा तीन मागण्या तिने राहुल गांधी जवळ केल्या आहेत. या सर्व मागण्या राहुल गांधी यांनी मान्य करत तिला सर्वोतपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
”मी पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री सर्वांना भेटण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र कुणीही मला भेटले नाहीत. राहुल गांधी यांनी स्वत:हून मला फोन केला आणि भेटायला बोलावले. मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांनी मला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. राहुल गांधी माझ्या या लढाईत माझ्य़ा सोबत आहेत”, असे उन्नाव बलात्कार पीडितेने प्रसारमाध्यमांना सांगितले.


























































