मुंबईला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा, लोकल सेवा विस्कळीत; विमानांच्या उड्डाणावर परिणाम

मुंबईत मंगळवारी रात्री वादळी वाऱयासह पडलेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली असताना आज सलग दुसऱया दिवशी दुपारी सुमारे 4 च्या सुमारास अवकाळी पावसाने मुंबईकरांना पुन्हा झोडपले. धूळ आणि सोसाटय़ाच्या वाऱयासह ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसाने मुंबईची जीवनवाहिनी असलेली मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. धीम्या मार्गावरील लोकल सुमारे दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे विमान सेवेवरही परिणाम झाला असून अनेक विमानांच्या उड्डाणांमध्ये बदल करण्यात आला.

हवामान विभागाने आज दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण होते, तर वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातही जोरदार वाऱयासह पाऊस पडला, मात्र दुपारी सुमारे चारच्या सुमाराला धुळीचे वादळ उठवत वादळी वारा वाहू लागला आणि पावसाला सुरुवात झाली. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

दहिसर चेकनाक्यावर पाणी

पश्चिम उपनगराला सकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दहिसर, बोरिवलीसह अनेक उपनगरांना याचा चांगलाच फटका बसला. दहिसर चेकनाका आणि इतर ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यामुळे सर्वसामान्य आणि वाहनचालकांना यातून वाट काढत आपली कामाची ठिकाणे गाठावी लागली. दरम्यान, ठाणे, दिवा, कल्याण, नवी मुंबई आणि एमएमआर प्रदेशात पावसाने चांगलीच हजेरी लावली.

रिक्षावर झाड कोसळून मुंबईच्या डबेवाल्याचा मृत्यू

अवकाळी पावसामुळे रिक्षावर झाड कोसळून मुंबईच्या डबेवाल्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. तुकाराम खेंगळे असे या डबेवाल्याचे नाव आहे. या अपघातामुळे खेंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डबेवाला संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतनिधीची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोडवर गुलमोहराचे झाड चालत्या रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचालकासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. या अपघात रिक्षाचालकासह तिघांचा मृत्यू झाला असून यात तुकाराम खेंगळे यांचादेखील समावेश होता. तुकाराम खेंगळे अनेक वर्षे मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करत होते.