नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फळबागा, पिकांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहर परिसरासह तालुक्यात आणि जिह्यात राहाता, कोपरगाव, श्रीगोंदा तालुक्यांसह अन्य काही ठिकाणी शुक्रवारी (दि.11) सायंकाळी व रात्री वादळी वारे, ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे जिह्यात अनेक भागांत द्राक्षांच्या बागा, संत्र्यांच्या बागा, आंबा, टरबूज, खरबूज तसेच गहू, हरभरा, ज्वारी, कांदा यांसह शेतातील उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा मोठा आर्थिक फटका शेतकऱयांना बसणार आहे.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. वादळी वारे त्यात जोरदार पाऊस आल्याने शेतातील सोंगून व काढणी केलेली पिके झाकून ठेवण्यासाठी शेतकऱयांची एकच धांदल उडाली, तर या पावसाने द्राक्ष, आंबा, चिक्कू फळबाग शेतकरी यांची चिंता अधिक वाढली आहे. त्याचबरोबर काढणीला आलेला हरभरा, गहू ,ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

श्रीगोंदा तालुक्यालाही या वादळाचा व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले. गहू काढणीला आला आहे, तर कांदा पीकही शेवटच्या पाण्यावर असतानाच अवकाळी पावसाने कहर केला आहे. कांदा पिकाच्या पाथीमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे कांदा साठवणीसाठी योग्य राहणार नसल्याने शेतकऱयांना मातीमोल भावामध्ये हा कांदा विकावा लागणार आहे. अवकाळी पावसात नुकसानग्रस्त ठरणाऱया शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

राहाता व कोपरगावातील द्राक्ष, आंब्याच्या बागांना फटका

राहाता व कोपरगाव तालुक्यात अर्धा ते पाऊण तास या अवकाळी पावसाच्या सरी मुसळधारपणे बरसत होत्या. यामुळे शेतातील उभ्या पिकांनासुद्धा मोठा फटका बसणार असून, द्राक्ष, आंबा, फळबाग शेतकरी मोठय़ा चिंतेत दिसून येत आहेत. द्राक्ष व आंबा याची या हंगामातील सुरुवातच असून, सुरुवातीलाच अवकाळीचे संकट या फळांवर आल्याने मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांचे नुकसान होईल. मालाला योग्य ती चकाकी नसल्यास भावसुद्धा गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा व गहू पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसणार आहे.

तोडय़ात आलेल्या संत्राबागांचे नुकसान

नगर तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या अकोळनेर, सारोळा कासार, घोसपुरी, खडकी, खंडाळा, बाबुर्डी घुमट, वाळुंज परिसरात रात्री उशिरापर्यंत जोरदार वारा वाहत होता. त्यामुळे या भागात उशिरा फळधारणा झालेल्या आणि आता तोडय़ात आलेल्या संत्रा बागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या वादळामुळे झाडावरील संत्र्याची फळे खाली गळून पडली आहेत. अनेकांच्या बागांमध्ये फळांचा सडा पडलेला पाहावयास मिळाला. त्यामुळे संत्र्याच्या बागा असलेल्या शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे.