
बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीला पत्र पाठवून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचा इशारा दिला आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीला पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडूनच सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला आणि इतर पीडितांसाठी एसआयटीने हेल्पलाईन क्रमांक आणि इतर माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. या माध्यमातून दररोज विविध प्रकारच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे. यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणाचेच गुन्हे नाहीत, तर अनेक कौटुंबिक वादासंदर्भातदेखील तक्रारी येत आहेत. याचदरम्यान खरात प्रकरणात वादग्रस्त भूमिका असलेल्या चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या तक्रारीत आणखी कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख केला गेला आहे आणि तक्रार देणारी व्यक्ती कोण आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
तक्रारीच्या सत्यतेची पडताळणी सुरू
ही तक्रार खरी आहे की खोटी याची खातरजमा होऊ शकलेली नाही. ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित आहे का? किंवा कुणीतरी खोडसाळपणा केला आहे का यासाठी एसआयटीकडून तक्रारीच्या सत्यतेची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पत्राची चौकशी – मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पूर्ण काळजी राज्याचे पोलीस खाते घेईल. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केली आहे. जे काही पत्र मिळाले आहे त्याचीही जरूर चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.





























































