
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच तिकीटवाटपावरून शहकाटशहाचे राजकारणही सुरू आहे. आता भाजपने समाजवादी पक्षाला आणखी एक धक्का दिला आहे. मुलायमसिंह यांचे साडू प्रमोद गुप्ता भाजपात दाखल झाले आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अखिलेश यांच्यावर आरोप केला आहे. अखिलेश यांनी आमचे नेताजी मुलायमसिंह यांना बंदी बनवल्याचा आरोप गुप्ता यांनी केला. त्यांच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांना अखिलेश काय प्रत्युत्तर देणार याची चर्चा सुरू आहे.
मुलायमसिंह यांचे साडू प्रमोद गुप्ता यांच्यासह काँग्रेसची पोस्टर गर्ल प्रियंका मौर्य यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मुलायम यांची सून अपर्णा यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे. मुलायमसिंह यांच्या घरातच फूट पाडून त्यांच्या कुटुंबियांना भाजपात दाखल करून घेत भाजपने समाजवादी पक्षाला धक्का दिला आहे. तसेच मोजी प्रशासकीय अधिकारी किशनसिंह अटोरिया, गायिका वंदना मिश्रा, सपाचे युवा नेते मनोज मोंटू, सपाचे नेते अजितसिंह चौहान यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
भाजपात प्रवेश करण्यापूर्वी प्रमोद गुप्ता यांनी अखिलेश यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अखिलेश यांनी मुलायमसिंह यादव यांना बंदी केले असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. पक्षात मुलायमसिंह यांची स्थिती दयनीय झाली आहे. अखिलेश त्यांना सोबत घेऊन कार्यालयात जातात. तसेच त्यांना घेऊनच घरी परततात. त्यांना बोलण्यासाठी माइकही देण्यात येत नाही. सपामध्ये गुन्हेगार आणि जुगारी आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ या काँग्रेसच्या मोहीमेतून प्रसिद्ध झालेली पोस्टर गर्ल प्रियंका मौर्य यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. आपल्याला तिकीट देण्यासाठी प्रियंका गांधी यांच्या सचिवाने पैशांची मागणी केली होती, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.
मुलायमसिंह यांची सून अपर्णा यादव यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. मात्र, त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्ष, अखिलेश किंवा मुलायमसिंह यांच्यावर कोणतेही आरोप किंवा टीका केली नव्हती. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याने प्रेरीत होत भाजपात प्रवेश केल्याची त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपात दाखल होताच प्रमोद गुप्ता यांनी अखिलेश यांच्यावर आरोप केले आहेत. तर काँग्रेसच्या पोस्टर गर्ल प्रियंका मौर्य यांनाही काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण अधित तापण्याची शक्यता आहे.























































