शाहरुख खानला बेदम मारहाण

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शाहरुख खान असे या तरुणाचे नाव असून म्हैस चोरल्याचा संशयावरुन त्याला जमावाने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

येथील भोलापूर डिंडोलिया भागात ही घटना घडली आहे. नोकरीनिमित्त दुबईत राहणारा शाहरुख काही महिन्यांपूर्वीच आईवडीलांना भेटण्यासाठी गावी आला होता. मंगळवारी संध्याकाळी शेजारी राहणाऱ्या तीन तरुणांसोबत तो बाहेर गेला. पण मध्यरात्र उलटली तरी तो घरी परतला नाही. यामुळे घरातल्यांनी त्याची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्वजण रात्री उशीरा घरी येणार असल्याचे मित्राच्या घरातल्यांनी त्यांना सांगितले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून घरातल्यांना फोन आला. शाहरुखची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले.

त्यानंतर त्याच्या घरातल्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी शाहरुखने सांगितलेला वृत्तांत ऐकून घरातल्यांना धक्काच बसला. शाहरुखने सांगितले की माजिद व पप्पू नावाचा मित्र त्याला फिरण्याच्या निमित्ताने भोलापूर डिंडोलिया येथे घेऊन गेले. तेथे त्या दोघांनी म्हैस चोरण्याची योजना आखली. यास शाहरुखने विरोध केला. पण तरीही मित्रांनी त्याला फक्त आमच्यासोबत चल असे सांगितले. त्यानंतर रात्री अडीच वाजता एका गोठ्यात दोघे मित्र म्हैस चोरण्यास गेले व शाहरुखला बाहेर उभे राहण्यास त्यांनी सांगितले. पण अचानक गोठ्याच्या मालकाला जाग आली. त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळे दोघा मित्रांनी तेथून पळ काढला. पण गोठ्याबाहेर उभा असलेला शाहरुख मात्र जमावाच्या तावडीत सापडला. गावकऱ्यांनी त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. अखेर इतरांनी मध्यस्थी करत जमावाच्या तावडीतून शाहरुखची सुटका केली व त्याला रुग्णालयात दाखल केले. पण आईवडीलांची भेट झाल्यानंतर काहीवेळातच उपचारादरम्यान शाहरुखचा मृत्यू झाला.

summary- up-mob lynching on buffalo