UP News – लाच म्हणून 5 किलो बटाट्यांची मागणी, पोलीस अधिकारी निलंबीत

गेल्या काही वर्षांपासून पोलीसांच्या माध्यामातून लाच मागण्याच्या घटना सोशल मीडियामुळे उघडकीस आल्या आहेत. अशीच घटना काही दिवासंपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडली असून, पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडे चक्क 5 किलो बटाट्यांची मागणी केली. सोशल मीडियावर ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यामुळे सदर प्रकार उघडकीस आला आहे.

राम कृपाल सिंह असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज पोलीस स्टेशनमध्ये तो तैनात होता. मिळालेल्या माहितीनुसार, लाच म्हणून राम कृपाल सिंह याने शेतकऱ्याकडून 5 किलो बटाट्यांची मागणी केली. परंतु शेतकऱ्याने त्याची मागणी फेटाळत 2 किलो बटाटे देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि शेवटी 3 किलो बटाटे घेण्यास राम कृपाल सिंह तयार झाला. घडलेल्या घटनेची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. त्यानंतर राम कृपाल सिंह या लाचखोर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

कन्नौज पोलिसांनी सखोल चौकशी केली असता “बटाटा” हा शब्द फक्त एक कोडवर्ड म्हणून वापरण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी राम कृपाल सिंह यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. कन्नौज पोलिसांनी ट्वीट करत याची माहिती दिली. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.