
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची नूतन इमारत बांधकाम व कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंध मंजुरीवरून सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. विरोधकांना प्रश्न विचारण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी माईक दिला नसल्याने त्यांनी सभेत सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या, तर विद्यमान सत्ताधारी समर्थकांनी पारदर्शी कारभार व एकअंकी व्याजदरामुळे सभासदांचे कल्याण करणाऱ्या संचालक मंडळांचा जयजयकार केला. बँकेची पावणेदोन तास सभा गाजली.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारणसभा अध्यक्ष संतोष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली माधवनगर रोडवरील डेक्कन हॉ लमध्ये पार पडली. सभेला सत्ताधारी स्वाभिमानी मंडळाचे नेते, माजी अध्यक्ष विनायक शिंदे, फत्तू नदाफ, संचालक शामगोंडा पाटील, धनाजी घाडगे, संजय महिंद, संचालिका रुपाली गुरव, अनिका काटे आदी संचालक व शिक्षक संघाचे नेते अविनाश गुरुव, महादेव हेगडे उपस्थित होते.
सभेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त व सत्ताधाऱ्यांनी सभागृहामधील पुढच्या रांगा व्यापल्याने विरोधकांना व्यासपीठावर समोर जाता आले नाही. बँकेच्या इमारती बांधण्यासाठी आठ कोटींची उधळपट्टी केली असल्याचा आरोप विरोधी संचालकांनी केला. आकृतिबंध नव्याने मंजुरी करून कर्मचारीभरती केली जाणार असल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक झाले. मात्र, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना माईकच दिला नाही. त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करत फलक फडकावले. यावेळी सत्ताधारी गटाच्या समर्थकांनीदेखील सत्ताधारी संचालक मंडळाच्या जयजयकारच्या घोषणा दिल्या. यामुळे गोंधळ निर्माण झाला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी लाड यांनी सभा नोटीस वाचली. मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यास मंजुरी दिली. अध्यक्ष जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सत्ताधाऱ्यांनी मंजुरीच्या घोषणा देत सर्व विषयांना मान्यता दिली. विरोधकांनी नामंजूरच्या घोषणा देत विरोध केला. अपुरे संख्याबळ व सत्ताधाऱ्यांनी केलेली नाकाबंदी यापुढे विरोधकांचा निभाव लागला नाही. त्यामुळे विरोधी बँक बचाव कृती समितीने सभेतून बाहेर पडत यु. जी. जाधव, सयाजीराव पाटील, माणिकराव पाटील, कृष्णा पोळ आदींनी सभागृहाबाहेर समांतर सभा घेतली.
सत्ताधाऱ्यांची दादागिरी
बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. सर्वसाधारण सभेत सदस्यांना प्रश्न विचारता येणार असून, आम्ही उत्तरे देणार, असे सांगत होते. मग आम्हाला माईक का दिला गेला नाही? महिलांना पुढे बसवून सत्ताधाऱ्यांनी सभा रेटून नेली. नवीन इमारतीच्या आडून सभासदांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला आहे. नोकरभरती करण्यासाठीच आकृतिबंधला फेरमंजुरी देण्याचा घाट घातला. बेकायदेशीर पदोन्नती, नोकर भरतीतून मोठा आर्थिक लाभ मिळवत संचालक मालामाल होत आहेत, तर शिक्षक बँकेचे सभासद कंगाल होत आहेत. या विरोधात आता सहकार विभाग व न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बँक बचाव कृती समितीचे नेते यु. टी. जाधव यांनी सांगितले