उरण परिसरात नागरी वस्त्यांमध्ये सापडताहेत अजगरच अजगर!

956

उरण परिसरात ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये याआधी क्वचितच आढळून येणारे भले मोठे अजगर मोठ्या संख्येने दिसु लागले आहेत. यामध्ये सर्वत्रच आढळून येणाऱ्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगरांची संख्या सर्वाधिक आहे. मागील दोन महिन्यांत तर भक्ष्यासाठी उरण परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये आलेल्या सुमारे 45 ते 50 अजगर सर्पमित्रांनी पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक आवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहेत.

उरण परिसरात औद्योगिक पसारा वाढतच चालला आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि विकासाच्या नावाखाली डोंगर, दऱ्या, टेकड्या बुलडोझर फिरवून नष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील वनसंपदा नष्ट झाली आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे नैसर्गिक हिरवळही सिमेंट कॉक्रीटच्या वाढत्या जंगलात हरवुन गेली आहे. परिणामी वन्यजीवांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. वन्य जमिनींवर मानवांचे अतिक्रमणही वाढले आहे. मानवांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे जंगलातील वन्यजीवांनी भक्षांसाठी आता आपला मोर्चा नागरी वस्त्यांमध्ये वळवला आहे. याआधी नागरी वस्त्यांमध्ये पक्षी आणि विविध प्रकारचे साप आणि अन्य सरपटणारे मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यामध्ये आता भल्यामोठ्या अजगरांची भर पडली आहे.

याआधी सदानकदा जंगलातच आढळून येणारे अजगर आता भक्ष्यांच्या शोधार्थ नागरी वस्त्यांमध्ये येताना आढळून येऊ लागले आहेत. मागील दोन महिन्यात उरण परिसरातील विविध ठिकाणाहून सुमारे 45 ते 50 अजगर सापडले आहेत. यामध्ये चार ते 14 फुट लहान मोठ्या आकार आणि लांबीच्या अजगरांचा समावेश आहे. 5 ते 25 किलो वजनाचे अजगर बकऱ्या, कुत्री, मांजरे, उंदीर, कोंबड्या खाण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये येतात. असे अजगर कधी कोंबड्यांच्या खुराड्यात कधी बकऱ्यांच्या गोठ्यात सापडताना दिसतात. काही वेळा तर परिसरात यांत्रिक दगदगीच्या ठिकाणी असलेल्या कंटेनर मालाच्या गोदामातही भले मोठे अजगर आढळून आले आहेत. यामध्ये सर्वत्रच आढळून येणाऱ्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगरांची संख्या सर्वाधिक आहे.

सध्या डोंगर, जंगल परिसरात यांत्रिक आवाजाची धडधड वाढली आहे. त्यातच जंगलात भक्ष्याची चणचण भासत आहे.त्यामुळेच भक्षांच्या शोधार्थ नागरी वस्त्यांमध्ये येणाऱ्या अजगरांची संख्या वाढत चालली आहे. मागील दोन महिन्यात मानवी वस्तीत आलेल्या 16 बेबी पायथॉन तर 9 मोठे अजगर पकडून जंगलात सोडून दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या