वाढत्या अतिक्रमणामुळे वन्यजीवांची नागरी वस्त्यांकडे धाव

236

सामना प्रतिनिधी। उरण

उरण परिसरात ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये याआधी क्वचितच आढळून येणारे विविध प्रकारातील विषारी,बिन विषारी साप, भले मोठे अजगर मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. काही महिन्यांपासून भक्ष्यांच्या शोधार्थ येणाऱ्या विविध जातींच्या सापांची संख्या अधिक आहेत. वने, डोंगर, हिरवळ नष्ट होत चालल्याने आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक आश्रयस्थानांवर मानवाने अतिक्रमण केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचे सर्पमित्र सांगत आहेत.

उरण परिसराचे झपाट्याने औद्योगिकिकरण होत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि विकासकामाच्या नावाखाली डोंगर, दर्‍या, टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात बुलडोझर फिरवुन भुईसपाट करण्यात येत आहेत. यामुळे नैसर्गिक वनसंपदा नष्ट झाली आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे नैसर्गिक हिरवळही सिमेंट-कॉक्रिटच्या वाढत्या जंगलात हरवून गेली आहे. खोदाई, भरावाच्या कामामुळे वन्यजीव तसेच सापांची अंडी,पिल्ले दगड मातीच्या भरावाबरोबरच वाहून जाऊ लागली आहेत. परिणामी वन्यजीवांची आश्रयस्थाने जमिनदोस्त झाल्याने आणि वन्यजमिनींवर मानवांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे जंगलातील हजारो वन्यजीवांनी नागरी वस्त्यांकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे उरण परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये क्वचितच नजरेला पडणारे मोर,लांडोर,गरुड या सारख्या दुर्मिळ पक्ष्यांबरोबरच सरपटणारे प्राणीही मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागले आहेत. जंगलात आढळुन येणारे भलेमोठे अजगरही मानवी वस्त्यांमध्ये भक्ष्यांच्या शोधार्थ येऊ लागले आहेत. मागील काही महिन्यात उरण परिसरात पाच फुटापासुन चौदा फुट लांबी पर्यतचे भलेमोठे अजगर आढळुन आल्याची माहिती फ्रेण्डस् आँफ नेचर संघटनेचे अध्यक्ष आणि सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी दिली.

उरणच्या विशेषता ग्रामीण वस्तीत इंडियन रॉक पायथॉन जातीतील नर-मादी अजगर,विषारी जातीतील नाग,मण्यार,घोणस तसेच बिन विषारी सापांबरोबरच अन्य वन्य जीवांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याची माहीती सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी दिली.नागरी वस्त्यांबरोबरच सातत्याने दगदग असलेल्या जेएनपीटी बंदरातील विविध कंटेनर यार्डमध्येही विषारी,बिन विषारी जातींच्या सापांसह अजगरही आढळून येऊ लागले आहेत. वन्यजीवांच्या आश्रयस्थानावरच मानवाने केलेल्या अतिक्रमणामुळेच दुर्मिळ वन्यजीव नागरी वस्त्यांकडे मोठ्या प्रमाणात फिरकू लागल्याचे या सर्पमित्रांचे म्हणणे आहे. नागरी वस्त्यांमध्ये विषारी-बिनविषारी आदी विविध जातीच्या सापांचा वावर वाढल्याने मात्र नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या