
उरणचे मुख्याधिकारी समीर जाधव हे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच यापुढे सर्व सभा, बैठकांचे कामकाज आता लाईव्ह करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. मुख्याधिकारी समीर जाधव हे नेहमीच अरेरावी, उद्धट आणि थातूरमातूर उत्तरे देत दिशाभूल करतात. उरण शहराच्या संपूर्ण दुरवस्थेला मुख्याधिकारी जबाबदार आहेत असा आरोप नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी केला. त्यांच्याकडून विकासकामांसाठी नेहमीच असहकार्याची भूमिका राहिली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या कृतीविरोधात वरिष्ठांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, नगराध्यक्षांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी सांगितले.
अधिकारी-बिल्डरांमध्ये साटे आणि लोटे
काही इमारतींच्या बांधकामांकरिता मुख्याधिकाऱ्यांनी एमआयडीसीला पाणीपुरवठ्यासाठी थेट एनओसी दिल्या आहेत. यामध्ये नगर परिषदेला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. बिल्डर्स आणि अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोपही घाणेकर यांनी केला.



























































