उरणच्या ‘ओएनजीसी’त अग्निकल्लोळ; चार ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संवेदनशील असलेल्या ओएनजीसी प्रकल्पात आज पहाटे जबरदस्त अग्निकल्लोळ उठला. एपीयू प्लाण्टमध्ये लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना सीआयएसएफचे तीन जवान मृत्युमुखी पडले. तर एकजण गंभीर जखमी झाला असून ओएनजीसीच्या अधिकाऱ्यालाही आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. ही आग एवढी भीषण होती की, त्याच्या ज्वाला अक्षरशः गगनाला भिडल्या. चारही बाजूंनी सर्वत्र धूर पसरला आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट उडाली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापि गुलदस्त्यात असून ते शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबईतील सीएनजी स्टेशन्स ठप्प

ओएनजीसी प्रकल्पात लागलेल्या आगीचा परिणाम मुंबईतील सीएनजी स्टेशन्सवरही झाला. या प्रकल्पातून वाहनांसाठी सीएनजी, पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र आग लागताच सकाळी 8 पासून सर्व सीएनजी स्टेशन्स ठप्प झाले. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, कारचालकांचे चांगलेच वांदे झाले. ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा तुटवडा जाणवल्याने चालकांना पर्यायी इंधनाचा मार्ग शोधावा लागला.

ओएनजीसी प्रकल्पातील एपीयू प्लाण्टमध्ये अत्यंत ज्वलनशील समजल्या जाणाऱ्या नाफ्ता रसायनाचा मोठा साठा आहे. आज पहाटे चारच्या सुमारास हा प्लाण्ट नाफ्त्यामुळे ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे कामगारांनी चेज ओव्हरची प्रक्रिया सुरू केली.

चेंज ओव्हर सुरू असताना दिरंगाई झाल्याने ओव्हरफ्लो झालेला नाफ्ता प्लाण्टच्या सभोवताली पसरला. काही क्षणातच त्याचा हवेशी संपर्क येऊन नव्याने उभारण्यात आलेला एपीयू प्लाण्ट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

आगीशी झुंज देणारे सीआयएसएफचे जवान सतीश कुशवाह (36), कॅप्टन इराना मुनियप्पा नायका (48), एम. पासवान (33) यांचा होरपळून मृत्यू झाला. तर महेंद्र कुमार हा जवान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओएनजीसीचे आरपीएस अधिकारी सी. एन. राव हेदेखील आगीच्या वेढय़ात सापडले आणि ते शहीद झाले.