
अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव वाढत चालला आहे. अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त असून याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने कॅरेबियन समुद्रामध्ये विमानवाहू युद्धनौका तैनात केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कॅरेबियन समुद्रात अमेरिकन सैन्याची अतिरिक्त कुमक तैनात केली असून विमानवाहू युद्धनौका ‘यूएस जेराल्ड फोर्ड’ला लॅटिन अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमेरिकेने उचललेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल आहे.
‘यूएस जेराल्ड फोर्ड’ ही जगातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका आहे. यावर 5 हजारांहून अधिक जवान आणि 75 लढाऊ विमानं तैनात आहेत. ही युद्धनौका आता कॅरेबियन समुद्रात तैनात करण्यात आल्याने अमेरिका आणि व्हेनेझुएलातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनीही अमेरिकेला इशारा दिला असून हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे. मादुरो यांचे निकटवर्तीय डायोसदादो कॅबेलो यांनी म्हटले की, आम्ही 100 वर्ष चालणाऱ्या युद्धाची तयारी करत आहोत. याचाच अर्थ व्हेनेझुएला अमेरिकेपुढे सहजासहजी झुकणार नाही.
व्हेनेझुएला अमेरिकेशी गोरिला युद्धनिती प्रमाणे लढण्याची तयारी करत आहे. स्नायपर्स, आणि घातक क्षेपणास्त्रांच्या मदतीने युद्धनिती बनवली जात आहे. कारण मादुरो यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी अमेरिकन सैन्याला व्हेनेझुएलामध्ये आतपर्यंत घुसावे लागेल.
सध्या मादुरो हे देखील राजधानी कराकास जवळील एका डोंगरात बनवण्यात आलेल्या बंकरमध्ये आहेत. त्यांच्या सुरक्षेत क्यूबाचे ब्लँक वॉस्प कमांडो तैनात आहेत. तिथेच अमेरिकेशी सामना कसा करायचा याची रणनिती तयार केली जात आहे.































































