अमेरिकेत हिंदुस्थानच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले

327

उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठणाऱया हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 2018-19 या शैक्षणिक वर्षात जवळपास 3 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या आता दोन लाखांवर गेली आहे.

इंटरनॅशनल एज्युकेशन एक्स्चेंजच्या ‘ओपन डोअर्स’ अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. हा अहवाल सोमवारी दिल्लीमध्ये प्रकाशित करण्यात आला. अमेरिकेत शिक्षण घेणाऱया विविध देशांतील विद्यार्थ्यांमध्ये हिंदुस्थानच्या एकूण विद्यार्थ्यांचे प्रमाण 18 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत शिक्षण घेणाऱया विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येने विक्रम नोंदवला. अहवालातील आकडेवारीनुसार, चीनचे सर्वाधिक म्हणजेच 3,69,548 विद्यार्थी अमेरिकेत शिकत असून त्यापाठोपाठ हिंदुस्थानातील 2,02,014 या विद्यार्थीसंख्येचा क्रमांक लागतो.

हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण मिळते!

हिंदुस्थानातील विद्यार्थी सर्वोत्कृष्ट शिक्षणाचा शोध घेत आहेत. अमेरिका त्यांच्यासाठी चांगल्या शिक्षणाची ऑफर देते. शिक्षणासाठी ते जेवढे पैसे गुंतवतात तेवढय़ाच पटीने गुणवत्तापूर्ण शिक्षण आम्ही त्यांना देतो, असे अमेरिकन दूतावासाचे मंत्री चॅरिसे फिलिप्स यांनी अहवाल प्रकाशित करताना नमूद केले.

अमेरिकेत मुख्यत; चीन, हिंदुस्थान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कॅनडा, व्हिएतनाम, तैवान, जपान, ब्राझिल आणि मेक्सिको या देशांतील विद्यार्थी अधिक आहेत. या विद्यार्थ्यांकडून अमेरिकेतील कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, टेक्सास, मसाचुसेट्स, इलिनोईस, पेन्सील्कानिया, फ्लोरिडा, ओहियो, मिशिगन आणि इंडियाना या राज्यांना पसंती देण्यात आल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या