महायुद्धाच्या भीतीने शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे साडेनऊ लाख कोटी बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामुळे जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. महायुद्धाच्या भीतीचे पडसाद हिंदुस्थानातही उमटू लागले असून त्याचा पहिला तडाखा आज शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एखादी दरड कोसळावी तसा 1700 अंकांनी कोसळला, तर निफ्टीचेही बारा वाजले. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे साडेनऊ लाख कोटींचे नुकसान झाले.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर इराण माघार घेईल अशी अपेक्षा होती; मात्र इराणने संपूर्ण आखातातच अमेरिकी तळांना लक्ष्य करून तांडव घातले. अमेरिका-इस्रायलनेही हल्ल्याची तीव्रता वाढवली. त्यामुळे मंगळवारी परिस्थिती अधिकच चिघळली. धुलिवंदनाच्या निमित्ताने मंगळवारी शेअर बाजार बंद होता. त्यामुळे बुधवारी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे बुधवारी बाजारात भूकंप झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही गडगडले. दिवसअखेर सेन्सेक्स 1,123 अंकावर स्थिरावला, तर निफ्टी 385 अंकांनी घसरून बंद झाला.

रुपयाचीही घसरगुंडी

आखातातील युद्ध चिघळल्याचा परिणाम रुपयाच्या किमतीवरही झाला असून डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या मूल्याने आतापर्यंतचा नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया 67 पैशांनी महाग होऊन 92.16 रुपयांवर पोहोचला. सोमवारी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 41 पैशांनी घसरून 91.49 रुपये झाले होते.

पेट्रोल पंपांवर रांगा

जगातील 20 टक्के तेल वाहतूक करणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने कच्च्या तेलाचे दर भडकण्याची चिन्हे आहेत. या भीतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांत आज पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या. महामार्गांवरील पंपांवरही हेच चित्र होते. दरम्यान, लगेचच दर वाढणार नाहीत, असे सांगत पंपचालक गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत.