
वर्षानुवर्षे युद्धग्रस्त भागातून वार्तांकन करणाऱ्या प्रसिद्ध अमेरिकन स्वतंत्र पत्रकार शैली किटलसन यांचे मंगळवारी संध्याकाळी बगदादमध्ये अज्ञात इसमांनी अपहरण केले. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पत्रकारिता क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैली किटलसन यांचे अपहरण बगदादमधील गजबजलेल्या ‘अल-सादून स्ट्रीट’ (al-Saadoun Street) वरील ‘बगदाद हॉटेल’ जवळून करण्यात आले. काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून नेले.
इराकच्या गृह मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, “एका परदेशी पत्रकाराचे अपहरण झाले असून सुरक्षा दलांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे,” असे स्पष्ट केले आहे.
अपहरणकर्त्यांचा शोध घेत असताना सुरक्षा दलांनी एका संशयित वाहनाचा पाठलाग केला. पोलिसांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात अपहरणकर्त्यांचे वाहन उलटले. या कारवाईत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे, मात्र शैली किटलसन यांच्या बाबत अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.
कोण आहेत शैली किटलसन?
शैली किटलसन या एक स्वतंत्र पत्रकार आहेत. त्यांनी इराक, अफगाणिस्तान आणि संपूर्ण मध्य पूर्वेतील अत्यंत धोकादायक आणि संघर्षग्रस्त भागांतून अनेक वर्षे धाडसी रिपोर्टिंग केले आहे.विशेषतः दहशतवादी संघटना ‘इसिस’ (ISIS) विरोधातील युद्धाचे त्यांनी सविस्तर वार्तांकन केले आहे.त्या सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल युद्ध आणि त्याचा इराणवर होणारा परिणाम, तसेच इराकमधील जमिनीवरील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तिथे गेल्या होत्या.





























































