
हिंदुस्थानने कच्चे तेल कुठून खरेदी करायचे, हे अमेरिका ठरवू लागली आहे. अमेरिकेने हिंदुस्थानला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची सूट दिली आहे. 3 एप्रिलपर्यंत ही सूट देण्यात आली असून त्यानंतर हिंदुस्थान अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवेल, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे. अमेरिकेने तेल खरेदीबाबत सूट दिल्यावरून काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. हा प्रकार म्हणजे ‘तडजोड केलेल्या व्यक्तीचे शोषणाचे हे परिणाम आहेत,’ अशी टीका राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केली आहे.
स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे की, ही परवानगी केवळ समुद्रात अडकलेल्या तेलाच्या खरेदीसाठीच देण्यात आली आहे. याअंतर्गत 5 मार्चपर्यंत जहाजांवर लोड झालेल्या रशियन कच्च्या तेलाचीच खरेदी भारताला करता येईल.
अमेरिकेच्या परवानगीची गरज का? –अरविंद केजरीवाल
‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी तेल खरेदीच्या मुद्दय़ावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, हिंदुस्थानला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी देणारी अमेरिका कोण होते? हिंदुस्थानला अमेरिकेच्या परवानगीची गरज काय? ट्रम्प यांच्यासमोर तुम्ही झुकले. अशी कोणती मजबुरी आहे ज्यामुळे तुम्हाला ट्रम्पसमोर झुकावे लागले, असा सवाल केजरीवाल यांनी केला.
तडजोड केलेल्या व्यक्तीचे शोषण -राहुल गांधी
अमेरिकेकडून हिंदुस्थानची तेल खरेदी नियंत्रित करण्यात येत असल्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटले की, आपल्या लोकांच्या इच्छेतून आपले परराष्ट्र धोरण तयार होते. आज आपण जे पाहत आहोत ते धोरण नसून तडजोड केलेल्या व्यक्तीच्या शोषणाचे ते परिणाम आहेत, असे राहुल म्हणाले. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनीही टीका करताना म्हटले की, आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेची परवानगी आवश्यक आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.



























































