गुंतवणुकीसाठी ट्रम्प जपान दौऱ्यावर, जपानच्या पंतप्रधान ताकायाची आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना भेटणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जपान आणि दक्षिण कोरिया दौऱ्यावर रवाना झाले. सर्वात आधी ते जपानला भेट देणार आहेत. त्यानंतर दक्षिण कोरियाला जातील. जपानच्या नवनिर्वाचित पंतप्रधान साने ताकायाची यांच्याशी व्यापार आणि गुंतवणूक करारांवर चर्चा करतील. ट्रम्प यांनी 2019 मध्ये जपानला भेट दिली होती. त्यानंतर ते 2025 मध्ये जपान दौरा करत आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्त टोकियोमध्ये 18,000 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. 2002 नंतर जपानमधील ही सर्वात मोठी सुरक्षा मोहीम आहे. जपानमध्ये जुलै 2022 मध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि एप्रिल 2023 मध्ये तत्कालीन पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर हल्ला करण्यात आला होता व त्यांच्या भाषणादरम्यान स्पह्टक यंत्र फेकण्यात आले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या दौऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्या दौऱ्याआधीच जपानने अमेरिकेत 46 लाख कोटींचे गुंतवणूक करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जपानने अमेरिकेत चिप्स, फार्मास्युटिकल्स, शिपिंग आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करावी अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. यामुळे अमेरिकेत नोकऱ्या वाढतील, असे ट्रम्प यांना वाटत आहे.

दोन दिवसांपूर्वी फोनवरून चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानच्या पंतप्रधान ताकायाची यांची दोन दिवस आधीच फोनवरून सविस्तर चर्चा झाली आहे, तर ट्रम्प यांनी ताकायाची यांचे काwतुक केले आहे. जपानने आपल्या लष्करावर अधिक पैसे खर्च करावेत, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. जपान दौऱ्यानंतर ट्रम्प हे दक्षिण कोरियाला जातील. ते आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेत सहभागी होतील. ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतील.