मारिया मचाडो यांना मिळाले शांततेचे नोबेल, ट्रम्प यांचा स्वप्नभंग

व्हेनेझुएलायच्या मारिया कोरिना मचाडो या बहाद्दूर महिलेला आज शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. व्हेनेझुएलाच्या लोकांच्या हक्कांसाठी आणि देशाला शांततेच्या मार्गाने हुकूमशाहीतून लोकशाहीकडे नेण्याच्या अथक प्रयत्नांसाठी मारिया कोरिना मचाडो यांची सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली. या निवडीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्काराचे स्वप्न भंगले. विविध देशांमधील युद्ध थांबवल्याचा दावा करून, पॅम्पेन राबवून, दबाव टाकूनही ट्रम्प यांना नोबेल मिळालेले नाही. ट्रम्प यांच्या दबावापुढे नोबेल समिती झुकली नाही.

नोबेल समितीने ओस्लो येथे शुक्रवारी शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली. या प्रतिष्ठत पुरस्कारासाठी 338 नामांकने आली होती. त्यामध्ये 244 व्यक्ती आणि 94 संस्थांचा समावेश होता. डोनाल्ड ट्रम्प, आपण जगातील अनेक युद्धे शांततेच्या मार्गाने थांबवल्याचा दावा करत आपल्यालाच या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, अशी इच्छा सातत्याने व्यक्त करत होते. ‘माझे ओव्हल ऑफिस जगभरातील सर्व शांतता करारांचे केंद्र बनले आहे. जानेवारीमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वीच रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्ष संपवण्यासाठी मी वाटाघाटी सुरू केल्या होत्या,’ असे ट्रम्प म्हणत होते. याचबरोबर अनेक देशांनी ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा म्हणून पाठिंबाही दिला होता. मात्र नोबेल समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना डावलत मारिया कोरिना मचाडो यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

व्हाईट हाऊसचे नोबेल समितीवर टीकास्त्र

ट्रम्प यांना शांततेचा नोबेल नाकारण्यात आल्याने व्हाईट हाऊसने थेट नोबेल पारितोषिक समितीवर टीकास्त्र सोडले आहे. नोबेल समितीने मारिया कोरिना मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले आहे, असे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये नमूद केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यापुढेही शांतता करार करत राहतील, युद्धे संपवतील आणि जीव वाचवतील. त्यांच्याकडे मानवतेचे हृदय आहे आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ते पर्वतही हलवू शकतात, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

व्हेनेझुएलाची आयर्न लेडी

व्हेनेझुएलाच्या ‘आयर्न लेडी’ अशी मारिया कोरिना मचाडो यांची ओळख आहे. लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी व्हेनेझुएलामध्ये अथक प्रयत्न केले आहेत. मारिया कोरिना मचाडो यांचे नाव ‘टाइम’ मासिकाच्या 2025च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही आहे.