पाकिस्तानने कांगावा करू नये! निकी हॅले यांनी झापले

‘दहशतवाद्यांनी हल्ला करून निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार हिंदुस्थानला आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता ‘हल्लापीडित’ आहोत, असे कार्ड खेळून उगाच कांगावा करू नये,’ अशा शब्दांत अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हॅले यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे पाकिस्तानला झापले आहे.

‘दहशतवादी कारवायांना तुम्ही पाठिंबा दिला तर तुम्हाला कुणी असेच सोडणार नाही. हिंदुस्थानने जे केले ते योग्यच आहे,’ असे हॅले यांनी म्हटले आहे. ‘दहशवादी कारवायांना पाठिंबा किंवा समर्थन देण्यासाठी कोणत्याही देशाला परवानगी मिळू शकत नाही,’ असेही हॅले यांनी नमूद केले आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवीत नऊ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. या हल्ल्यात नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. त्यावरून हॅले यांनी आरसा दाखविला.