ट्रम्प-पुतिन बैठक अचानक रद्द झाल्यानंतर अमेरिकेचा रशियाला धक्का, दोन खनिज तेल कंपन्यांवर घातले निर्बंध

गेल्या चार वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये एक बैठक झाली होती आणि दुसरी बैठक बुडापेस्टमध्ये होणार होती. मात्र ही बैठक अचानक रद्द झाली आहे. त्यानंतर आता अमेरिकेने मोठे पाऊल उचलत रशियाच्या दोन सर्वात मोठ्या खनिज तेल कंपन्यांवर निर्बंध घातले आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष मिटवण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच रशिया शांतता चर्चा गांभीर्याने घेईपर्यंत अशी पावले उचलली जातील, असेही अमेरिकेने म्हटले.

अमेरिकेने रोसनेफ्ट आणि ल्युकोईल या दोन रशियन खनिज तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. आजचा दिवस खूप मोठा आहे. रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर कठोर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहे. आम्हाला आशा आहे की आता युद्ध संपुष्टात येईल. आम्ही क्षेपणास्त्र आणि इतर हत्यारांबाबतही विचार केला, परंतु मला वाटत नाही त्याची गरज पडेल, असे ट्रम्प म्हणाले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी युक्रेनला टोमाहॉक क्षेपणास्त्र देण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले होते.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, जिथून संघर्षाला सुरुवात झाली तिथून रशियाने मागे परतले पाहिजे. हे युद्ध खूप लांबले असून आता ते मिटले पाहिजे. गेल्याच आठवड्यात रशिया आणि युक्रेनचे असे मिळून 8 हजार सैनिक मारले गेले. माझे असे स्पष्ट मत आहे की, आता दोन्ही देशांना शांतता हवी असून हे युद्ध चार वर्षांपासून सुरू आहे. जर मी त्यावेळी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर हे युद्ध सुरुच झाले नसते.