
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत वाढली असतानाच गुरुवारी ’व्हाईस प्रेसिडेंशिअल डिबेट’ पार पडली. यावेळी डेमोक्रेट पार्टीच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर आरोपांचा जोरदार भडीमार केला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात ट्रम्प सरकार सपशेल अपयशी ठरले. महामारी लपवण्याचा प्रयत्न केला. सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे हे सरकार दुसऱ्यांदा निवडणूक जिंकण्याच्या लायकच नाही, असे सडेतोड आरोप हॅरिस यांनी केले.
साल्ट लेक सिटीमध्ये ही ’व्हाईस प्रेसिडेंशिअल डिबेट’ पार पडली. हॅरिस आणि पेन्स यांनी 12 फुटांच्या अंतरावर बसून प्रश्न-उत्तरांचा सामना केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये संरक्षण काच उभारली गेली होती. हॅरिस यांनी सुरुवातीपासूनच ट्रम्प सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. तुम्हाला 28 जानेवारीलाच कोरोना संसर्गाची माहिती मिळाली होती. मात्र, ट्रम्प व तुम्ही हातावर हात ठेवून केवळ तमाशा बघितला, असा आरोप हॅरिस यांनी केला. त्यावर पेन्स यांनी सरकारने चीनमधून येणाऱ्या लोकांना वेळीच रोखल्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचल्याचा दावा केला. हॅरिस यांनी कोरोना लसीबाबतही ट्रम्प यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नसल्याचे सांगितले.
बराक ओबामांच्या कारकिर्दीत ’ओबामा केअर बिल’चा दोन कोटी लोकांना फायदा झाला. आपण याला टाळे लावले. यातून अर्थव्यवस्थेच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, तुमच्याच कारकिर्दीत अमेरिका चीनसोबत ’व्यापार युद्ध’ हरलेय. शेतकरी संकटात गेलेत. बेरोजगारी प्रचंड वाढलीय. ट्रम्प कृष्णवर्णियांशी भेदभाव करताहेत. मित्रराष्ट्रांशी गद्दारी करून पुतीनसारख्या हुकुमशहाशी मैत्री करतात, असे आरोप हॅरिस यांनी केले. त्यावर प्रत्येक गोष्टीवरून राजकारण करू नका, असे प्रत्युत्तर उपराष्ट्राध्यक्ष पेन्स यांनी दिले.























































