अरे देवा! तीनशे रुपयांचा खोटा दागिना 6 कोटीला विकत घेतला, परदेशी महिलेला घातला गंडा

हल्ली लुटा लुटीचे नवनवीन प्रकार ऐकायला मिळत असतात. जयपूर मध्ये एका परदेशी तरुणीला चक्क एका सोनाराने सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या परदेशी महिलेने जयपूरमधील सोनाराविरोधात तक्रार दाखल केली असून सध्या तो व त्याचे वडील फरार आहेत.

चेरीश असे त्या महिलेचे नाव असून ती मूळची अमेरिकेची आहे. तिने गेल्या वर्षी अमेरिकेत एका प्रदर्शनात सोन्याचा हार पाहिला होता. तो हार विकत घेण्यासाठी तिने राजस्थानमधील जोहरी बाझार येथील गौरव सोनी या सोनाराशी संपर्क साधला. इंस्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांशी व्यवहार केला. चेरीशने त्या हारासाठी गौरव सोनी याला सहा कोटी रुपये पाठवले.

मात्र चेरीशला मिळालेला हार हा खोटा असल्याचे तिच्या लक्षात येताच ती हिंदुस्थानात आली. तिने याबाबत गौरव सोनीला जाब विचारला. मात्र त्याने तिचे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर चेरीशने याप्रकरी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस गौरव सोनी याला अटक करण्यासाठी आले असता तो व त्याचे वडील फरार असल्याचे समजले. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.