Monsoon Diet- पावसाळ्यात कुरकुरीत भजी करण्यासाठी या टिप्सचा वापर करा

पावसाळा आणि भजी यांचं एक अनोखं नातं आहे. बाहेर मस्त कोसळणारा पाऊस, गरमागरम मसाला चहा आणि सोबतीला भजी. म्हणजेच सोने पें सुहागाच म्हणायला हवं. पावसाळ्याची संध्याकाळ ही जिभेचे चोचले पुरवण्याची संध्याकाळ म्हणायला हवी.

चहा किंवा काॅफीच्या कपासोबत भजी असल्यास, माहोल अधिकच रंगतदार होईल. हा रंगतदार माहोल करण्यासाठी भजीसुद्धा तितकीच कुरकुरीत असतील तर बातही कुछ और हैं.. अनेकजणी घरी भजी करताना, काही बेसिक चुका करतात. त्यामुळे भजी कुरकुरीत न होता ती नरम होते. नरम भजी खाण्यात खरोखर मजा नसते. अशावेळी क्रिस्पी भजी करण्यासाठी आपण छोट्या टिप्सचा अवलंब केला तर भजी नक्कीच क्रिस्पी होतील.

क्रिस्पी भजी करण्यासाठी बेसिक टिप्स

कांदाभजी कुरकुरीत होण्यासाठी, कांदे पातळ कापावेत म्हणजे कांदा तेलात तळण्यासाठी फार वेळ लागणार नाही.

पिठात बेकिंग सोडा घालताना प्रमाण योग्य ठेवावे, म्हणजे भजीसाठी तेल जास्त लागणार नाही.

भजी तळण्यासाठी तेल खूप गरम अजिबात असता कामा नये. तर भजी करण्यासाठी तेल हे मध्यम गरम असावे. म्हणजे भजी कच्ची तळली जाणार नाहीत आणि मस्त खुसखुशीत होतील.

 

कोणत्याही पद्धतीची भजी असो, भजीचे पीठ तयार करताना बेसन पीठ घेतल्यास, त्यात किमान दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ घालावे. त्यामुळे भजी कुरकुरीत होण्यास मदत होते.

गरम तेलात थोडे मीठ टाकल्यास, भजी जास्त तेल शोषणार नाही. त्यामुळे नुसती तेलकट भजी होणार नाहीत.

 

भजीचे बॅटर करताना ते व्यवस्थित फेटून घ्यायला हवे, तर भजी मस्त कुरकुरीत होतील ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.

 

पालक, बटाटा, ओव्याची पाने, खासकरुन पालकाच्या पानांची भजी करताना पाने किंवा बटाटा धुवून झाल्यानंतर कोरडे करावे. त्यानंतर बॅटरमध्ये घालावे. भजी कुरकुरीत होण्यासाठी घेतलेल्या भाज्या कोरड्या करुन घ्याव्यात.

Monsoon Diet- पावसाळी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ‘हा’ काढा आहे रामबाण उपाय