हरिद्वारनंतर उत्तर प्रदेशातील अवसानेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 2 भाविकांचा मृत्यू; 29 जखमी

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड परिसरात असलेल्या पौराणिक औसानेश्वर महादेव मंदिरात रविवारी अपघात घडला. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, औसनेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेकासाठी जमलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीत रात्री 12 वाजल्यानंतर जलाभिषेकाला सुरुवात झाली. दरम्यान, रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात अचानक करंट लागला. करंट लागल्याचे कळताच, चेंगराचेंगरी झाली. घटनेदरम्यान भाविकांमध्ये गोंधळ उडाला. लोक आरडाओरडा करत इकडे तिकडे धावू लागले. अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर 29 जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. सुरक्षेसाठी मंदिर परिसरात आधीच पोलिसांचा बंदोबस्त होता, परंतु अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने हैदरगड आणि त्रिवेदीगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले, तर काही गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालय बाराबंकी येथे ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी आणि पोलिस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांच्यासह उच्च अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले. डीएम म्हणाले की काही माकडे विजेच्या तारेवर उड्या मारल्या होत्या, ज्यामुळे तार तुटली आणि मंदिर परिसराच्या पत्र्यावर पडली.

यामुळे विद्युत प्रवाह पसरला आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की अपघातात 29 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बाराबंकी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळत आहेत.