उत्तर प्रदेश – लग्नात नाच थांबवला म्हणून तरुणीवर गोळी झाडली, व्हिडीओ व्हायरल

3173

उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशात अजून एक भयंकर घटना उघड झाली आहे. एका लग्न समारंभात नाचणाऱ्या तरुणीने नाच थांबवला म्हणून तिच्यावर गोळी झाडण्यात आली आहे.

ही घटना 1 डिसेंबरची असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधील टिकरी या गावी ही घटना घडली. टिकरीच्या सरपंचाच्या मुलीचा लग्नसोहळा सुरू होता. त्यावेळी काही नर्तकींना बोलवण्यात आलं होतं. एका नर्तकीने तब्येत बिघडल्याने नृत्य करणं थांबवलं. त्यामुळे फूल सिंह नावाच्या माणसाने तिच्यावर गोळी झाडली. तिच्या गळ्याकडे ही गोळी लागल्याने तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. शिव अरूर नावाच्या एका व्यक्तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत नर्तकीने नृत्य थांबवल्यानंतर एक माणूस गोली चल जायेगी असं म्हणतो तर त्यानंतर सुधीर भैया आप गोली चलाही दो असं ऐकू येतं. त्यानंतर नर्तकीवर गोळी झाडली गेली. ही गोळी तिच्या चेहऱ्याखाली लागली. या प्रकरणी फूल सिंह आणि सरपंच सुधीर सिंह या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. फूल सिंह हा सरपंचाचा नातेवाईक असून या घटनेत सरपंचाचे दोन अन्य नातेवाईकही बंदुकीचे छर्रे लागून जखमी झाले आहेत. या प्रकरणी नवऱ्यामुलाच्या मामांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पुढची कारवाई झाली. दरम्यान या नर्तकीला लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.

पाहा या घटनेचा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या