उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी पत्र लिहून व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना संसर्गाने थैमान घातले असून कोरोनाच्या दुसऱया लाटेत उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेचा तर पुरता बोजवारा उडला आहे. रुग्णांना वेळेवर बेड, रुग्णवाहिका तसेच उपचार मिळणे अवघड झालेय. कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱया लखनौमधील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येथील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. ही परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली नाही तर लखनौमध्ये लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे ब्रजेश पाठक यांनी म्हटले आहे. पाठक यांनी आरोग्य सचिवांना लिहिलेले पत्र समोर येताच कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांना लखनौ सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार, असा प्रश्न केला आहे.

कायदामंत्र्यांकडून आरोग्य व्यवस्थेचे पोस्टमॉर्टेम

  • कोरोना अहवाल 4 ते 7 दिवसांनी मिळतो
  • खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी बंद करण्यात आली.
  • चाचणीसाठी पुरेशा प्रमाणात टेस्टिंग किट मिळत नाही
  • रुग्णवाहिकेसाठी फोन केला तर तीदेखील मिळत नाही
  • प्रत्येक जिह्यात दररोज 4 ते 5 हजार कोरोना रुग्ण आढळतात
  • रुग्णालयतात बेड नसल्याने उपचार मिळत नाहीत
  • रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत नाही

सीएमओकडून दखल नाही

लखनौ तसेच राज्यातील कोरोना स्थितीबाबत राज्याची आरोग्य व्यवस्था सांभाळणाऱया ‘सीएमओ’मधील अधिकाऱयांकडून फोन केल्यास त्याची दखलच घेतली जात नाही. आरोग्य अधिकारी परिस्थितीत सुधारणा होईल असे आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात काहीच करत नाहीत, असे पाठक यांनी पत्रात म्हटले आहे.

चोवीस तासांत 18 हजार रुग्णांची नोंद

उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत 18 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 5382 रुग्ण हे लखनौमध्ये सापडले आहेत. प्रयागराज 1856, कानपूर 1271, वाराणसीमध्ये 1404 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

रुग्णवाहिका न मिळाल्याने पद्मश्री योगेश प्रवीण यांचा मृत्यू

पद्मश्री पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. योगेश प्रवीण यांची तब्येत सोमवारी दुपारी अचानक बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सीएमओ ऑफिसमध्ये फोन करून मी स्वतŠ मदत मागितली. रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली, पण ती उपलब्ध झाली नाही. रुग्णवाहिकेअभावी डॉ. प्रखीण यांना वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी म्हटले आहे.