इन्स्टाग्रामवरील मित्राला भेटायला गेला, मारहाण करत लुटलं आणि ब्लॅकमेल केलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक फ्रेंड रिक्वेस्ट आणि काही दिवसांची चॅटिंग मग एक भेट… लखनऊमध्ये एक अशी घटना उघडकीस आली आहे, जिथे तरुणाला सोशल मीडियाद्वारे मैत्री करणे चांगलेच भोवले आहे. इंदिरानगर येथील एका तरुणाने इन्स्टाग्रामवर काही तरुणांशी मैत्री केली. इन्स्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर त्याला तरुणांनी भेटीसाठी बोलावले. त्यानंतर आरोपींकडून तरुणाला ओलीस ठेवून मारहाण करण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तरुणाच्या म्हणण्यानुसार, 30 नोव्हेंबर २०२५ रोजी त्याची इन्स्टाग्रामवर शिवम नावाच्या एका तरुणाशी मैत्री झाली. काही दिवसांनंतर, शिवमने त्याला गाडीवरून फिरायला नेण्याच्या बहाण्याने रात्री 8:20 च्या सुमारास खुर्रमनगर परिसरात बोलावले. तिथून तो त्याला बाईकवरून CIMAP च्या दिशेने घेऊन गेला. पण वाटेत आधीच वाट पाहत असलेले शिवमचे मित्र संदीप आणि विवेक हे देखील तिथे पोहोचले.

तरुणाचा असा आरोप आहे की, संदीपने पीडिताच्या खिशात गांजाचे पाकीट ठेवले आणि त्याला गांजा तस्करीच्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. त्या तरुणाने विरोध केल्यानंतर विवेकने चाकू बाहेर काढला. त्यानंतर ते तिघे त्याला जंगलात घेऊन गेले आणि त्याला निर्दयपणे मारहाण केली. त्यांनी त्याच्या तोंडावर रुमाल बांधला आणि त्याला बांधून ठेवले. आरोपींनी केवळ त्याला ओलीस ठेवले नाही तर, त्याची सोन्याची चैन आणि त्याच्याकडून रोख रक्कम लुटली. इतकेच नाही तर त्याला ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी भाग पाडले. तसेच, त्याला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ बनवण्यात आला.

इंदिरानगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून घटनास्थळाच्या आसपास लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी करत आहेत. निरीक्षक अजय नारायण सिंह यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण जुने असले तरी, तक्रारीच्या आधारे अहवाल दाखल करण्यात आला आहे. याआधी देखील या आरोपींविरोधात अशा प्रकरणाची तक्रार आली होती. प्राथमिक तपासात असेही उघड झाले आहे की, आरोपींना यापूर्वी इंदिरानगरसह इतर पोलीस ठाण्यांकडून कारवाई झाली होती.

सोशल मिडियावर अशा टोळ्या आधी विश्वास संपादन करतात, मग पीडितांना अनोळखी ठिकाणी बोलावून ते गुन्हा करतात आणि नंतर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात, आणि ब्लॅकमेल करतात. ज्यामुळे पीडित व्यक्तीला गप्प राहावे लागते. म्हणून, अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे टाळा. सोशल मीडियावरील प्रत्येक हसरा चेहरा विश्वासार्ह नसतो. एक छोटीशी चूक गंभीर धोका निर्माण करू शकते. म्हणून, सतर्क राहा आणि सुरक्षित राहा.